- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती
मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिके अडचणीत आली असताना, अशा भागांतील नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील ज्या भागांत पावसाची मोठी तूट आहे, तेथे पिकांची स्थिती तपासून आवश्यक ती मदत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिके वाचविण्यासाठी दिवसाला १२ तास वीज देण्याबरोबरच जळालेले रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) तातडीने बदलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पीकपाहणी आणि राज्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडला आहे आणि त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्या भागांचे सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातील काही भागांत पावसाची तूट लक्षणीय आहे. विदर्भात सुमारे ३५ टक्के पाऊस कमी झाला असून, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक ठिकाणी पिके आणि पाण्याची उपलब्धता अडचणीत आली आहे. त्यामुळे एकीकडे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, तर दुसरीकडे पिकांना वाचविण्यासाठी आवश्यक ते सिंचन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र ठरलेल्या झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी ...
पिकांना पाणी देण्यासाठी दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जळालेले रोहित्र तातडीने बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यासही सांगण्यात आले आहे. ज्या भागात पिके वाचविणे शक्य होणार नाही, तेथे सर्वेक्षण आणि पंचनाम्यांच्या आधारे नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule)
दरम्यान, पुढील आठवड्यात पावसाची शक्यता कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली आदी जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पॅकेज किंवा विशेष उपाययोजना करण्यात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सध्या सर्वप्रथम पंचनामे करणे महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पाऊस परतला आणि पावसाची तूट भरून निघाली तर परिस्थिती सुधारेल; अन्यथा सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचेही वर्षभराचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील विविध जलसाठ्यांमध्ये किती पाणी उपलब्ध आहे आणि ते पुढील काळात कशा पद्धतीने वापरता येईल, याचे नियोजन करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. सध्या उपलब्ध असलेले पाणी आणि जलसाठे जपून वापरणे आवश्यक असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत खेळाडूंच्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर क्षेत्रातील नोकरीसाठीच्या ५ टक्के आरक्षणाबाबत ...
गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेबाबतही बैठकीत सूचना देण्यात आल्या. सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काही कारखानदार आणि शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याबाबत विचारले असता, सरकारची भूमिका योग्य असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यास त्याचा पुढे फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील प्रकार गंभीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीतील कार्यक्रमस्थळी बनावट ओळखपत्रासह दोन जणांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. पीएमओ अधिकाऱ्याचा बनावट पास तयार करून कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न आणि एका व्यक्तीकडे शस्त्र आढळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकारामागे नेमके कोण होते, त्यांचा उद्देश काय होता आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास होईल, असे बावनकुळे म्हणाले. या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





