नवी मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने जाणाऱ्या एका एसी लोकल ट्रेनने प्रवासात कोणत्याही स्टेशनवर थांबा घेतला नाही. गाडी एकापाठोपाठ एक स्टेशन्स न थांबता पार करत पुढे जात राहिल्यामुळे डब्यात असलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डब्यात गोंधळ अन् प्रवाशांची भीती (Panvel CSMT AC Local)
'मुंबई रेल प्रवासी संघ' या संघटनेने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये सुमारे ८ ते १० प्रवासी आणि एक लहान मूल दिसत असून, ते सगळेच घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. ट्रेन थांबत नसल्याने पुढे काय होणार, या विचाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मोटरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
लोकल ट्रेन एकाही स्टेशनवर थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डब्यातील २ ते ३ प्रवाशांनी आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी असणाऱ्या इमर्जन्सी टॉक-बॅक यंत्रणेकडे (Emergency Intercom) धाव घेतली. ट्रेन का थांबत नाहीये हे विचारण्यासाठी आणि मोटरमनशी बोलण्यासाठी प्रवासी सातत्याने प्रयत्न करताना या व्हीडिओत दिसत आहेत.
Crime News : गुवाहाटीच्या (Guwahati) हाटीगाव परिसरात पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचं शीर धडापासून वेगळं करून ते ...
प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न, कारवाईची मागणी
हा व्हीडिओ शेअर करत मुंबई रेल प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर गाडीत काही मोठा अपघात घडला असता तर याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. या घटनेची गांभीर्याने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाची दखल अन् कार शेडचा दावा (Panvel CSMT AC Local)
सोशल मीडियावर हा व्हीडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या 'रेल्वे सेवा' या मदत कक्षाने या तक्रारीची दखल घेतली आहे. हे प्रकरण मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ही ट्रेन प्रवाशांसाठी नसून 'कार शेड'मध्ये (Car Shed) चालली होती आणि तशी घोषणा स्टेशनवर झाली होती, असा दावा काही युजर्स सोशल मीडियावर करत आहेत. तरीही प्रवासी चुकून गाडीत चढल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र, ही गाडी खरोखर कार शेडमध्ये जात होती की काही तांत्रिक बिघाडामुळे थांबली नाही, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे अजून बाकी आहे.






