Thursday, November 19, 2026

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हलसेमा यांनी 19 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन आर्थिक सहकार्य आणि शहरी विकासावर चर्चा केली. मेट्रो प्रकल्प, ट्रान्सपोर्ट हब, समुद्र स्वच्छता आणि विविध नागरी समस्यांवर उपाययोजनांचे आदानप्रदान करण्यावर या भेटीत भर देण्यात आला.

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज, दिनांक 19 नोव्हेंबर 2026 रोजी भेट घेतली. मुंबई महानगरासोबत आर्थिक संबंध सुधारण्याकामी त्यांनी ही भेट घेतली. या महापौरांसह प्रतिनिधींनी महापालिका सभागृहाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून न्याहाळले. यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या सभागृहात बोलत होत्या. आणि त्यांनीही वेलकम बोलत त्यांचे स्वागत केले.

मुंबई महानगरात वेगाने सुरू असलेल्या आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची फेम्‍के हलसेमा यांनी माहिती घेतली. तसेच मुंबईतील घरांची उपलब्‍धता, लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था या महत्‍वपूर्ण विषयांवर महापौर तावडे यांच्‍याशी संवाद साधला.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेतेच्या संदर्भात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत महापौर हलसेमा यांना माहिती देण्‍यात आली. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होईल, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या अनुषंगाने जकात नाक्यांच्या जागेवर सुरू असणाऱ्या 'ट्रान्सपोर्ट हब' प्रकल्पाचीही माहिती त्यांनी दिली. मुंबईतील विविध विकास प्राधिकरणाच्या समन्वयातून सुरू असलेल्या इमारत पुनर्विकासाच्या प्रकल्पांची माहिती देण्‍यात आली.

मुंबईतील समुद्र स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिका आणि 'द ओशन क्लीनअप' यांच्यात झालेल्‍या सामंजस्य कराराचेही महापौर हलसेमा यांनी कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, वाहतुकीच्या प्रकल्पांच्या निमित्ताने दोन्ही महानगरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्‍या माहितीचे आदान प्रदान करण्याबाबतचा मानसही महापौर हलसेमा यांनी व्यक्त केला. तर, मुंबई महानगरासमोरील आव्हानाच्या निमित्ताने अधिक परिणामकारक उपाययोजनांचे स्वागतच आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >