Thursday, November 19, 2026

Andheri Kurla Road : अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, तब्बल १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणार

पुढील तीन दिवसांत १३८ बांधकामे हटविण्याचे महानगरपालिकेचे नियोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने, ‘के दक्षिण’ विभागातील हसनत स्कूल, कदमवाडी मार्ग ते उत्तम ढाबा, मरोळ-मरोशी मार्ग या दरम्यानच्या १३.४० मीटर रुंदीच्या विकास नियोजन मार्गावरील (डीपी रोड) अडथळे दूर करण्याची कार्यवाही बुधवारी १८ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे एकूण १३८ बांधकामे बाधित होत असून, या कार्यवाहीमुळे अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सलग तीन दिवस ही कार्यवाही सुरू राहणार आहे.

उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त वनिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘के दक्षिण’ विभागामार्फत अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कारवाईच्या पहिल्याच दिवशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ७४ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. उर्वरित बांधकामे पुढील दोन दिवसांत हटविण्याचे नियोजन आहे.

या कार्यवाहीसाठी महानगरपालिकेचे ३० अधिकारी व कर्मचारी, २० महानगरपालिका कामगार, ५० खासगी कामगार आणि ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, ४ जेसीबी, ५ डंपर, २ इलेक्ट्रिशियन यांच्यासह गॅस कटर, ब्रेकर आदी यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीचा वापर करण्यात येत आहे. हा मार्ग रुंदीकरणामुळे परिसरातील वाहतुकीसाठी अधिक मार्ग उपलब्ध होऊन अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >