‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य असावे
मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेश देताना आधारकार्ड अथवा ओळखपत्राची सक्ती करण्याच्या मागणीला मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पाठिंबा दिला आहे. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी गरबा आयोजकांनी प्रवेशापूर्वी ओळख तपासावी, अशी भूमिका राणे यांनी मंगळवारी मांडली. मुस्लिम तरुणांना गरब्यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, त्यानंतरच हिंदू पद्धतीने उत्सवात सहभागी व्हावे, असेही राणे म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेने गरब्यात सहभागी होणाऱ्यांकडे आधारकार्ड किंवा ओळखपत्र असावे, अशी भूमिका घेतली असून त्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्याबाबत राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हा राजकीय नव्हे तर धार्मिक विषय असल्याचे सांगत राणे यांनी या मागणीचे समर्थन केले. हिंदू सणांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची ओळख स्पष्ट असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. गरबा आणि नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी काही तरुण हिंदू नाव सांगून, कपाळावर टिळा लावून हिंदू मुलींच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर फसवणुकीचे प्रकार घडतात. अशा घटनांपासून हिंदू मुलींचे संरक्षण करण्यासाठी ओळख तपासणीची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘डीजे'चा नियम सर्वांनाच लागू करा
- गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांमधील डीजेच्या आवाजावरून सुरू असलेल्या चर्चेवरही राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. डीजेमुळे त्रास होत असेल तर तो हिंदू सणांबरोबरच ईदच्या मिरवणुकीतही बंद असावा, असे त्यांनी सांगितले. सरकार आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे हिंदू समाजाकडून पालन केले जाते; त्यामुळे तेच नियम सर्व धर्मांना समानपणे लागू झाले पाहिजेत, असे राणे म्हणाले. - रस्त्यावर नमाज पढणे, मशिदींवरील भोंगे तसेच मिरवणुकांमधील डीजे या सर्व बाबतीत समान नियम असावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, नियम पाळण्याचा ठेका फक्त हिंदू समाजाने घेतलेला नाही, असे राणे म्हणाले.
Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि त्यानंतर झालेल्या ...
जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी अशा हिंदू समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची जबाबदारी महायुती सरकारची आहे. प्रत्येक समाजाच्या मागण्यांचा विचार करून सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये होत असल्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. एखादा कार्यक्रम कुठे घ्यायचा हा संबंधित संस्थेचा अधिकार आहे. सकाळी गुजराती समाजाबाबत टोकाची भूमिका मांडायची आणि संध्याकाळी त्याच समाजाच्या कार्यक्रमाला सहभागी व्हायचे, अशी दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, वडोदरा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी आणि मोठी मागणी असल्याचा उल्लेख करत राणे यांनी हीच मोदींची लोकप्रियता असल्याचे म्हटले. कार्यक्रमाची तिकिटे संपणे आणि मोठ्या संख्येने नागरिकांचे प्रतीक्षायादीत असणे हे पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचे द्योतक असल्याचा दावा त्यांनी केला.






