Wednesday, September 9, 2026

Nashik : कुंभमेळ्याच्या दर्शनपथासाठी पशुवैद्यकीय दवाखानाही हटणार ! जागा न मिळाल्याने ७ किमी दूर अंजनेरीला स्थलांतर

Nashik : कुंभमेळ्याच्या दर्शनपथासाठी पशुवैद्यकीय दवाखानाही हटणार ! जागा न मिळाल्याने ७ किमी दूर अंजनेरीला स्थलांतर

Nashik : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत पण या विकासकामांचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या दर्शनपथाच्या कामासाठी उपजिल्हा रुग्णालयासोबतच पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतही हटवण्यात येणार आहे. मात्र, दवाखान्यासाठी त्र्यंबक शहरात पर्यायी जागा न मिळाल्याने अखेर हा दवाखाना त्र्यंबकेश्वरपासून तब्बल सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी येथे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे.

दर्शनपथासाठी सरकारी इमारती हटणार

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी शहरात न वाढता त्यांनी दर्शन घेऊन पुढे जावं, यासाठी दर्शनपथ तयार केला जात आहे. या प्रकल्पासाठी तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या पाडकामाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर सध्या त्याच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, तहसील कार्यालय पुढील आठवड्यात पाडण्यात येणार असल्याने त्याचं स्थलांतर सुरू झालं आहे.

तुम्ही जागा दाखवा, आम्ही इमारत बांधून देतो

एकीकडे रुग्णालयाच्या पाडकामाला विरोध होत असताना दुसरीकडे पशुवैद्यकीय दवाखान्याला पर्यायी जागा मिळवण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहाहून अधिक गावांमधील ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी या दवाखान्यावर आहे. त्यामुळे हा दवाखाना शहरापासून दूर गेल्याने परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांना उपचारासाठी अतिरिक्त अंतर पार करावं लागणार आहे. जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून पर्यायही देण्यात आला. ‘तुम्ही जागा दाखवा, आम्ही इमारत बांधून देतो,’ असं प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं. मात्र, त्र्यंबक शहरात जागा उपलब्ध न झाल्याने हा प्रश्न कायम राहिला.

आता अंजनेरीतून दवाखाना होणार सुरू

या विषयी बोलताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मेहेरे यांनी त्र्यंबक नगरपालिकेशी जागेबाबत पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी शहरात जागा नसल्याचे सांगितले. आमची इमारतही पाडण्याचा प्रयत्न झाला. तहसील कार्यालयाच्या पाडकामास सुरुवात होईल तेव्हा आम्ही जागा खाली करू, असे सांगितले. तहसील कार्यालयाच्या स्थलांतरास सुरुवात झाल्याने आम्ही आता अंजनेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात स्थलांतरित होत आहोत. याबाबत नगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. पुढील सात दिवसांत हा दवाखाना अंजनेरी येथून पूर्णपणे कार्यरत होईल असे त्यांनी नमूद केले.

कायमस्वरूपी जागेचा शोध सुरू

दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाकडून पत्रव्यवहार सुरू आहे. सध्या जागेचा शोध घेतला जात असून, तोपर्यंत अंजनेरी येथून सेवा सुरू राहणार आहे. कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती मिळत असताना, दुसरीकडे ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी असलेला दवाखाना शहरापासून दूर जात आहे. त्यामुळे आता कायमस्वरूपी जागा कधी मिळणार, हा प्रश्न शेतकरी आणि पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >