Friday, September 11, 2026

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूरदरम्यान 4 विशेष रेल्वे धावणार

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूरदरम्यान 4 विशेष रेल्वे धावणार

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरदरम्यान 4 गणपती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेकडून गाडी क्रमांक 01497 मुंबई-कोल्हापूर विशेष रेल्वे 12 आणि 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4:20 वाजता कोल्हापूर येथे पोहोचणार आहे.

या रेल्वेचा परतीचा प्रवास गाडी क्रमांक 01498 द्वारे होणार असून, 12 आणि 14 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 12:05 वाजता कोल्हापूरहून ही गाडी रवाना होईल. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 1:30 वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

मुंबई ते कोल्हापूर प्रवासादरम्यान ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे या मार्गावरील गणेशभक्तांना गावी जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवेचा फायदा होणार आहे.

विशेष रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींचे डबे उपलब्ध असतील. यामध्ये प्रथम वातानुकूलित श्रेणीचा 1 डबा, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे 2 डबे, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 3 डबे आणि शयनयान श्रेणीचे 4 डबे असतील. याशिवाय सामान्य द्वितीय श्रेणीचे 4 डबे, 1 द्वितीय आसनासह गार्ड कम ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर डब्याचा समावेश असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >