Friday, September 11, 2026

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी; 48 तासांचा प्रवास करून नांदणीत दाखल, कोल्हापूरकरांनी उधळला गुलाल

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी; 48 तासांचा प्रवास करून नांदणीत दाखल, कोल्हापूरकरांनी उधळला गुलाल

कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर पुन्हा नांदणीत परतली आहे. गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये तिची देखभाल केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधुरीला तिच्या जुन्या ठिकाणी आणण्यात आलं. तब्बल 48 तासांचा प्रवास करत मुंबई आणि पुणेमार्गे माधुरी रात्री उशिरा नांदणीत दाखल झाली. तिच्या आगमनाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात तिचं स्वागत केलं.

माधुरी नांदणीत परतणार असल्याने गावात आधीपासूनच उत्साहाचं वातावरण होतं. ठिकठिकाणी तिच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच वनतारा रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार मानणारे पोस्टरही लावण्यात आले. माधुरी नांदणीत दाखल होताच कोल्हापूरकरांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.

माधुरीच्या पुनर्वसनासाठी नांदणीमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेत तिला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मोकळं वातावरण, मऊ वाळू, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायाम करण्यासाठी जलाशय आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा समावेश आहे.

हत्तीच्या आरोग्यासाठी केवळ अन्न आणि निवारा पुरेसा नसतो. त्यांच्या पायांची आणि सांध्यांची नियमित तपासणी, आरोग्याचं निरीक्षण आणि गरजेनुसार उपचार महत्त्वाचे असतात. त्यामुळे माधुरीच्या देखभालीसाठी आधुनिक उपचार आणि वैद्यकीय सुविधांवर भर देण्यात येणार आहे.

वनताराकडूनही माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. वनताराच्या सहकार्यामुळे माधुरी नांदणीत परतत असल्याचं गावकऱ्यांनी सांगत संस्थेचे आभार मानले आहेत. राजू शेट्टी यांनीही वनताराच्या भूमिकेचं कौतुक करत नांदणीमध्ये ‘मिनी वनतारा’ उभारल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, माधुरीच्या देखभालीसाठी हायपावर कमिटीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीची 24×7 देखरेख करावी लागणार असून किमान दर 15 दिवसांनी तिची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. तसेच दर महिन्याला तिच्या आरोग्याचा अहवाल समितीला द्यावा लागणार आहे.

माधुरीचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन अथवा भीक मागण्यासाठी वापर करता येणार नाही. 18 वर्षांखालील मुलांना तसेच प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना तिच्याशी शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय वन्यजीव कायदे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक असेल.

माधुरी ही कोल्हापूरकरांसाठी केवळ हत्तीण नसून नांदणीशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे. त्यामुळे तिची झालेली घरवापसी कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण ठरला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा