फायरप्रुफ बनवण्यासाठी तब्बल साडेदहा कोटींचा केला जाणार खर्च
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मागील कालावधीत अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात आग लागून ११ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अमरावती येथेही रुग्णालयात आग लागून १२ अर्भकाचा जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यातच मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातही मागील काळात आगीच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आणि अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून हे रुग्णालय फायरप्रुफ बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई आणि इतर राज्यांमध्ये अलिकडच्या काळात रुग्णालयाच्या ठिकाणी आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी केईएम रुग्णालयात छोटीशी आग तसेच विद्युत बिघाडामुळे जीवित हानी झाली होती. ५ एप्रिल २०२१ रोजी दहिसर जकात नाका बीएमसी कोविड-१९ सुविधेत आगीची घटना घडली होती. तसेच, १२ ऑगस्ट २०२० रोजी ठाणे कोविड केंद्रातील दिया रुग्णालयात आगीची घटना घडली होती. अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात ९ ऑक्टोबर २०२० रोजी आग लागून ११ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अमरावती येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून १२ अर्भकाचा जिवाला धोका निर्माण झाला होता. तसेच, भंडारा जिल्हा रुग्णालयात ९ ऑक्टोबर २०२० रोजी आगीच्या घटनेत १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रुग्णलयातील या आगींच्या दुर्घटना लक्षात घेता केईएम रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांच्या, डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींसह एकूणच रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी जुनी विद्युत् उपकरणे, स्विचगियर, एलटी पॅनेल, केबल्स ॲक्सेसरीज बदलण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून एलिप्रोज इंजिनिअरिंग या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याकरता १०.३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर पुन्हा नांदणीत परतली आहे. गुजरातमधील ...
केईएम रुग्णालयाच्या मार्फत, वैद्यकीय विद्यालयातील २००० विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपी, विविध संबंधित वैशिष्टयांमध्ये मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या रुग्णालयात ३९० कर्मचारी, ५५० निवासी डॉक्टर, विद्यार्थी आणि पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत. राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरण २०२१ च्या तरतुदीनुसार भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केईएम रुग्णालयाला भारतातील दुर्मिळ आजारांसाठी ८ उत्कृष्ठता केंद्रापैकी एक म्हणून नियुक्त केले आहे. १८०० बेड असलेले हे रुग्णालय दरवर्षी सुमारे १.८ दशलक्ष बाह्यरुग्ण आणि ८५,००० अंतर्गत रुग्णांवर उपचार करते, औषध आणि मुलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा प्रदान केली जाते.त्यामुळे डॉक्टरांसह रुग्णालयीन कर्मचारी तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची सुरक्षाही महत्वाची असल्याने हे रुग्णालय अधिक आग प्रतिबंधक उपाययोजनांसह सुसज्ज बनवले जात असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.