Saturday, September 12, 2026

Mumbai Fire : मुंबईत मोनोरेल स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग; जीटीबी नगर परिसरात घबराट

Mumbai Fire : मुंबईत मोनोरेल स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग; जीटीबी नगर परिसरात घबराट

मुंबई : सायन-कोळीवाडा परिसरातील गुरु तेघ बहादूर (जीटीबी) नगर मोनोरेल स्टेशनजवळ शनिवारी पहाटे एका इमारतीला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. इमारतीमधून आगीच्या मोठ्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे दृश्य समोर आले आहे. (GBT Fire)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. (Mumbai Fire )

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आग नेमकी कशामुळे लागली आणि इमारतीचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतरच नुकसानीचा अंदाज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ( Monorail Station)

दोन आठवड्यांत आगीची दुसरी घटना

जीटीबी नगर परिसरात मागील दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आगीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी जीटीबी नगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांच्या बाजूला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती.

त्या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. रेल्वे रुळांजवळच आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. रेल्वे पोलिसांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

जीटीबी नगर रेल्वे स्थानकापासून सुमारे 300 मीटर अंतरावर, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला सार्वजनिक पुलाजवळ ही आग लागली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आग आटोक्यात आणली होती. या घटनेतही कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नव्हती.

दरम्यान, जीटीबी नगर परिसरात पुन्हा आग लागल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी पहाटे लागलेल्या आगीचे नेमके कारण आणि नुकसानीची माहिती अग्निशमन दलाच्या तपासणीनंतर समोर येण्याची शक्यता आहे. ( Sion Koliwada)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा