Pune Crime : मित्र आले की उधारी आली असं सहज म्हणतो आपण, पण हीच उधारी एका मित्राच्या जीवावर बेतलीय. पुण्यातील चंदननगर परिसरात अवघ्या ६०० रुपयांच्या उसन्या पैशांच्या वादातून थेट मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. उधारीच्या पैश्यांवरून सुरु झालेला वाद आईवरून केलेल्या शिवीगाळामुळे अधिकच वाढला आणि वादाचा रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाला. राहुल राजेंद्र जंवाजाळ (वय २२, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) तात्काळ सूत्रे हलवत आरोपी आशिष डेव्हिड मगर (वय २७, रा. येरवडा) याला अटक केली आहे. (Pune Crime News)
उधारी नडली जीवावर बेतली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल आणि आशिष हे दोघे एकमेकांचे जुने मित्र होते. संशयित आरोपी आशिष हा एका खाजगी कंपनीत सध्या 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी आशिषने राहुलला ६०० रुपये उसने दिले होते. आशिषने आपले उसने दिलेले ६०० रुपये वारंवार परत मागितले. परंतु राहुल ते देण्यास टाळाटाळ करत होता. ज्यामुळे दोघांमध्ये आधीपासूनच तणाव निर्माण झाला होता. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगर येथील बोराटे वस्ती परिसरात दोघे भेटले. त्याठिकाणी ६०० रुपयांवरून त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण सुरू झाले. (Pune Crime News)
Yavatmal Accident : यात्रा म्हटली की पाळणे आलेच. अनेकांना या रंगेबेरंगी, मोठमोठ्या पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही पण याच पाळण्यामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर ...
आईवरून शिवीगाळ , संतापाच्या भरात चाकूने हल्ला
वाद विकोपाला गेल्यावर रागाच्या भरात राहुलने आशिषला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राहुलने आशिषला थेट आईवरून अतिशय अश्लील शिवीगाळ केल्याने आशिषचा पारा अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने खिशातून धारदार चाकू काढून थेट राहुलवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला. राहुलच्या हत्येने त्याच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तर उधारीच्या पैश्यातून निर्माण झालेला वाद एवढ्या मोठ्या टोकापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे पुढील तपास करत आहेत.





