Saturday, September 12, 2026

Modak Mahotsav 2026 : मुंबईकरांसाठी गोड बातमी! बाप्पाच्या नैवेद्याची चिंता नको; आता मुंबईकरांना मिळणार घरपोच उकडीचे अन् तळलेले मोदक

Modak Mahotsav 2026 : मुंबईकरांसाठी गोड बातमी! बाप्पाच्या नैवेद्याची चिंता नको; आता मुंबईकरांना मिळणार घरपोच उकडीचे अन् तळलेले मोदक

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु होणारच आहे; तेवढ्यातच आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. या गणेशोत्सवात बाप्पाचे आणि सर्वांचेच आवडते मोदक घरोघरी पोहोचणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) 'मोदक महोत्सव २०२६' चे आयोजन केले आहे, ज्यामध्ये पालिकेच्या पाठिंब्याने महिला बचत गटांनी तयार केलेले पारंपरिक उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध करून दिले जातील.

गणेशोत्सवाच्या काळात मोदकांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन, नागरिक https://shgeshop.com या संकेतस्थळावर मोदकांच्या घरपोच वितरणासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना १४ सप्टेंबरपासून त्यांच्या ऑर्डर थेट त्यांच्या दारात मिळतील. ही घरपोच वितरण सेवा केवळ मुंबईमध्येच उपलब्ध असेल.

'मोदक महोत्सव' गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत सुरू राहील. घरपोच सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आधी आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे, असे एका पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार मोदक मिळतील, तसेच या गटांना त्यांची बाजारपेठ आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्याची संधी मिळेल. संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या की, हा उत्सव केवळ गणेशोत्सवाचा आनंद वाढवणार नाही, तर मुंबईकरांना महिला उद्योजकांना पाठिंबा देण्याची आणि प्रोत्साहन देण्याची संधीही देईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >