Sunday, September 13, 2026

Amit Shah : भाषा-संस्कृती जपणारे राष्ट्र कधीही गुलाम होत नाही!

Amit Shah : भाषा-संस्कृती जपणारे राष्ट्र कधीही गुलाम होत नाही!

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ‘डी-कोलोनायझेशन’ म्हणजे इतिहास पुसणे नव्हे, भारतीय दृष्टिकोनातून तो पुन्हा मांडणे

मुंबई : “आपली भाषा, संस्कृती, स्मृती, इतिहास, संस्कार, अभिलेख आणि परंपरांचे रक्षण करता आले नाही, तर एखादा देश कितीही शक्तिशाली असला तरी त्याला संपायला वेळ लागत नाही. मात्र, या वारशाचे जतन करणाऱ्या देशाला कितीही वर्षे गुलाम ठेवले तरी त्याला पूर्णपणे गुलाम करता येत नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत केले. ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ येथे आयोजित ‘गणेश ज्ञानार्थी’ या विशेष पांडुलिपी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Amit Shah)

एशियाटिक सोसायटीला भेट देणारे पहिले केंद्रीय गृहमंत्री असल्याचे सांगताना शाह यांनी आपण येथे गृहमंत्री म्हणून नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरा हजारो वर्षे पुढे नेण्याच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून आलो असल्याचे सांगितले. भारतीय ज्ञानपरंपरेची वाहक म्हणून एशियाटिक सोसायटीने हे ज्ञान देशभर पोहोचवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय ज्ञानपरंपरा नष्ट करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत, असे शाह म्हणाले. नालंदेचे ग्रंथालय जाळता येऊ शकते; मात्र स्मृती आणि श्रुतीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजलेले ज्ञान नष्ट करता येत नाही, असे उदाहरण त्यांनी दिले. पराभव झाला तरी धैर्याने पुढे जाणे आणि विजय मिळाल्यानंतर पराभूत झालेल्यांच्या स्मृती नष्ट न करता त्यांना आपल्या परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न करणे हा भारताचा संस्कार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इतिहासाचे ‘डी-कोलोनायझेशन’ करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगताना शाह यांनी त्याचा अर्थ इतिहास पुसणे असा नसल्याचे स्पष्ट केले. इतिहास संपूर्ण आणि प्रामाणिकपणे भारतीय दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडणे म्हणजे ‘डी-कोलोनायझेशन’ होय, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिशांनी ज्ञान आणि सत्तेला एका सूत्रात बांधले होते. आता ज्ञानाला सत्तेपासून मुक्त करून ज्ञानाच्या आधारावर व्यवस्था उभी करण्यासाठी एशियाटिक सोसायटीने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (Amit Shah)

शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एशियाटिक सोसायटीला भेट देऊन विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची पाहणी केली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, जयकुमार रावल, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रवीण दरेकर तसेच एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Amit Shah)

‘इंडोलॉजी’चा भारतीय दृष्टिकोन

- इंडोलॉजी समजून घेणे एशियाटिक सोसायटी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे शाह यांनी सांगितले. नाणेविज्ञान, अभिलेखशास्त्र, मानवविज्ञान, इतिहास, पुरातत्त्व, भाषाविज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मशास्त्र आणि व्याकरण अशा विविध विषयांच्या अभ्यासातून इंडोलॉजीची निर्मिती झाली. मात्र, त्या काळातील या अभ्यासाचा उद्देश भारतीय ज्ञानपरंपरेप्रमाणे जगाचे कल्याण करणे नव्हता, तर येथील व्यवस्था समजून घेऊन दीर्घकाळ राज्य करणे हा होता, असा दावा त्यांनी केला. - एशियाटिक सोसायटीच्या ज्ञानसंपदेचा विस्तार तीन मार्गांनी करण्याची गरज शाह यांनी व्यक्त केली. ज्ञानाचा विस्तार करणाऱ्या विद्वानांना येथे आणणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देशभरातील ग्रंथालयांना परस्पर जोडणे आणि महाराष्ट्रातील गावागावांत असलेल्या पांडुलिपींचे जतन करून त्यातील संशोधन व ज्ञान ‘भारतम् पांडुलिपी’च्या माध्यमातून समोर आणणे, असे त्यांनी सुचविले.(Amit Shah)

‘गणेश ज्ञानार्थी’ प्रदर्शनाचे वैशिष्ट्य

‘गणेश ज्ञानार्थी’ प्रदर्शनात ऐतिहासिक पांडुलिपी, मौर्य, सातवाहन, गुप्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी, भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बोधिसत्त्वाच्या पूर्णाकृतीचे अवशेष, सुवर्णपुष्प, सातवाहनकालीन रजत नाणे, ऐतिहासिक नकाशे, दुर्मीळ ग्रंथ व पुरावशेष यांचा समावेश आहे. याशिवाय शाही दरबार अल्बम, वस्त्रोद्योगाचे नमुने, कोल्हापूरमधील पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेली अस्थिमंजूषा, कान्हेरी गुंफांमधून मिळालेली मंजूषा, हिमालय क्षेत्रातील बुद्ध प्रतिमा, अलंकृत विटा आणि वाई परिसरातून मिळालेले उखळपीठ आदी ठेवेही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. (Amit Shah)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >