Sunday, September 13, 2026

Sound Pollution : ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरीही. संयम हीच संस्कृती

Sound Pollution : ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरीही. संयम हीच संस्कृती

आगमन, विसर्जन मार्गात वाहतूक नियमांचे पालन करा

बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतूक नियमांचे पालन करावे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दीचे योग्य नियोजन करावे आणि आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवावे. ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरी संयम हीच संस्कृती आहे. ध्वनिक्षेपकाबाबत शासन, न्यायालय आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने केले आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होऊन २५ सप्टेंबर २०२६ रोजी विसर्जन सोहळ्याने संपन्न होणार आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे गणरायाचे स्वागत करताना भक्तीबरोबरच सुरक्षितता, शिस्त, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. समन्वय समिती अध्यक्ष ऍड नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश कार्यवाह गिरीष वालावलकर यांनी संयुक्तपणे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे.

यंदाचा गणेशोत्सव भक्ती, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव म्हणून साजरा करूया. गणेश मंडळानी मंडप, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूक यामध्ये आवश्यक सुरक्षा उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मंडळानी पर्यावरणाची काळजी घेताना निर्माल्याचे योग्य संकलन व विलगीकरण करावे आणि विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

गणेशोत्सवातून व्यसनमुक्तत्र, महिला व बालसुरक्षा, रक्तदान, अवयवदान, शिक्षण, आरोग्य, डिजिटल व सायबर सुरक्षा आणि गरजूंच्या मदतीसारखे उपक्रम राबवून सकारात्मक संदेश द्यावे असे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले आणि दिव्यांग भाविकांसाठी मंडळांनी शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भक्ती असेल तर शिस्त असेल, परंपरा असेल तर सुरक्षितता असेल. उत्साह असेल तर सामाजिक भान असेल आणि गणरायाची सेवा असेल तर समाजसेवाही असेल त्यामुळे मंडळानी सामाजिक भान ठेवून उत्सवाला अधिक लोकाभिमुख करावे असे अॅड. दहिबावकर म्हणाले.

गणेश मंडळे ही प्रशासनाची केवळ परवानगी घेणारी संस्था नसून, सुरक्षित आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाच्या आयोजनातील प्रशासनाची महत्त्वाची भागीदार आहेत. सर्वांनी मिळून यंदाचा गणेशोत्सव असा साजरा करूया की भक्तीचा आनंद, संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर निर्माण होईल असे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >