मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ आज मुंबईहून कोकणाच्या दिशेने रवाना झाली. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवत विशेष रेल्वेला रवाना केले.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वे आरक्षण मिळवण्यासाठी चाकरमान्यांना मोठी धावपळ करावी लागते. तसेच खासगी वाहनांचे वाढलेले भाडेही प्रवाशांसाठी मोठी अडचण ठरते. या पार्श्वभूमीवर ‘मोदी एक्सप्रेस’मुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळत आहे.
नितेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांसाठी ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले. मोफत प्रवासासोबतच आरक्षित आसनांची सुविधा उपलब्ध असल्याने चाकरमान्यांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येत आहे.
पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी परिसरातील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री चार वाहनांचा भीषण अपघात झाला. दोन ट्रक आणि दोन मोटारींच्या या ...
यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणासाठी रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी विशेष रेल्वे कोकणाच्या दिशेने रवाना झाली. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जात असल्याने या रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विशेष रेल्वे रवाना होत असताना दादर रेल्वे स्थानकात गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या समर्थनार्थही घोषणाबाजी करण्यात आली.
सलग 14 वर्षे कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक गणेशभक्त चाकरमान्यांनी नितेश राणे यांचे आभार मानले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे.






