Monday, September 14, 2026

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई ठाणे, कोकणापासून ते विदर्भापर्यंत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. कुठे रस्ते जलमय झालेत, कुठे गणेश मंडपामध्ये पाणी शिरलं, तर विदर्भ मराठवाड्यामध्ये याच पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने पावसाचं सावट असलं तरी बळीराजासाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान राज्यात हवामान खात्याने आज १४ सप्टेंबर आणि उद्या १५ सप्टेंबरला अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात मुसळधार ! हवामान खात्याचा इशारा

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १४ सप्टेंबरला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहू शकतात. मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

१५ सप्टेंबरलाही मुसळधार सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसह नाशिक घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई,ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, हिंगोली आणि नागपूरसह काही भागांतही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आणि गणेशमूर्तींच्या आगमन-विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'या' ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाच्या सरी

जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील काही भागांतही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४०-५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम यांसारख्या भागांतही अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला होता. सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सोमवारी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >