Thursday, October 29, 2026

Central Railway: मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा; अहिल्यानगर-येवला विभागात 'कवच 4.0' ची सुरक्षा तपासणी यशस्वी!

मध्य रेल्वेने अहिल्यानगर - येवला दरम्यानच्या 133 किमी विभागात 'कवच 4.0' सुरक्षा तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, आतापर्यंत एकूण 133.89 किमी मार्गावर ही कवच प्रणाली तपासण्यात आली आहे.

मुंबई: मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी मजल मारली आहे. दिनांक 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे विभागातील 133.89 किमी लांबीच्या अहिल्यानगर – येवला विभागात 'कवच 4.0' (सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल-4 - SIL-4) ची स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन (ISA) तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

स्वदेशी 'कवच' प्रणालीची वैशिष्ट्ये

'कवच 4.0' ही पूर्णपणे स्वदेशी विकसित 'ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टिम' (TCAS) आहे. रेल्वे अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करणे आणि रेल्वे प्रवासाची विश्वासार्हता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ही प्रगत प्रणाली खालील महत्त्वपूर्ण कार्ये करते:

  • सिग्नल ओलांडून पुढे जाण्याच्या (SPAD) घटनांना प्रतिबंध करणे.
  • गाड्यांच्या अतिवेगावर प्रभावी नियंत्रण ठेवणे.
  • आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलितरीत्या (Automatic) ब्रेक लावणे.

अहिल्यानगर - येवला या 133 किमी पट्ट्यात 12 रेल्वे स्थानके आहेत. हा संपूर्ण विभाग 12 स्टेशन TCAS युनिट्स, 4 लेव्हल क्रॉसिंग TCAS युनिट्स, 1 रिमोट इंटरफेस युनिट (RIU), 20 रेडिओ टॉवर्स आणि 1,774 रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग्जने सुसज्ज करण्यात आला आहे.

इटलीच्या पथकाद्वारे कसून तपासणी

या प्रणालीचे स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन इटली येथून आलेल्या विशेष पथकाद्वारे करण्यात आले. यामध्ये ओव्हरस्पीड संरक्षण, कायमस्वरूपी वेगमर्यादा (PSR) देखरेख, लेव्हल क्रॉसिंगवर स्वयंचलित शिट्टी वाजवणे, टर्नआउट वेग देखरेख तसेच SOS अलर्ट निर्माण करणे, रोलबॅक व रिव्हर्स हालचालींना प्रतिबंध करणे यांसारख्या विविध सुरक्षा वैशिष्ट्यांची कसून पडताळणी झाली.

मध्य रेल्वेचे 337 किलोमीटरपेक्षा जास्त जाळे सुरक्षित

मध्य रेल्वेने आतापर्यंत आपल्या विविध विभागांमध्ये मिळून एकूण 337.46 मार्ग-किलोमीटर अंतरावर 'कवच' प्रणालीची यशस्वी ISA तपासणी पूर्ण केली आहे:

  • नागपूर विभाग: आमला – छिंदवाडा विभाग (104.19 मार्ग-किमी)
  • सोलापूर विभाग: दौंड – कुर्डूवाडी विभाग (99.38 मार्ग-किमी)
  • पुणे विभाग: अहिल्यानगर – येवला विभाग (133.89 मार्ग-किमी)

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या संपूर्ण नेटवर्कवर 'कवच 4.0' च्या जलद अंमलबजावणीसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >