Monday, September 14, 2026

Trump Statement : व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत

Trump Statement : व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत

वॉशिंग्टन :मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एका वक्तव्यातून खळबळ उडवून दिली आहे. युद्ध संपल्यानंतरही इराणच्या आसपास अमेरिकेची लष्करी उपस्थिती कायम राहू शकते आणि व्हेनेझुएलाप्रमाणे इराणच्या तेलसंपत्तीवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.(Trump Statement)

आयरलंड दौऱ्यातील वक्तव्य आणि राजकीय संदर्भ

आयर्लंडमधील आयरिश ओपन गोल्फ स्पर्धेदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतचा संघर्ष नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या आसपास किंवा त्याआधी संपू शकतो. अमेरिका इराणमधून अखेरीस बाहेर पडेल, परंतु गरज भासल्यास व्हेनेझुएलाच्या धर्तीवर तेथील तेलाचा ताबा घेतला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. इराणकडून सातत्याने संपर्काचे प्रयत्न सुरू असले, तरी केवळ अमेरिकेच्या कडक अटींनुसारच योग्य करार स्वीकारला जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.(Donald Trump Iran Oil)

ऊर्जा बाजारावर परिणाम आणि वाढत्या किमती

सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर तीव्र परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत, तर अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळी गाठत प्रति गॅलन ६.२० डॉलरपेक्षा अधिक झाले आहेत. युद्ध संपताच अमेरिकेतील पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगाने खाली घसरतील, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.(Donald Trump Iran Oil)

व्हेनेझुएला पॅटर्नची चर्चा

ट्रम्प यांच्या या विधानाची तुलना ३ जानेवारी रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या अमेरिकेच्या कारवाईशी केली जात आहे. सीआयएच्या मदतीने आणि विशेष दलांच्या व्यापक सरावानंतर मादुरो यांना ताब्यात घेण्यात आले होते. याच धर्तीवर अमेरिका इराणमध्येही लष्करी उपस्थितीसह तेथील विशाल तेलसाठ्यांवर आणि ऊर्जा संसाधनांवर ताबा मिळवण्याच्या रणनीतीवर विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणकडून अद्याप या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.(Trump Statement)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >