
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विठाबाईंच्या आयुष्यातील संघर्ष, कलेप्रती असलेली निष्ठा आणि लावणी-तमाशाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान ट्रेलरमधून मांडण्यात आले आहे. यापूर्वी हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूरचा दमदार अंदाज
'ईठा' सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात विठाबाईंची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरच्या एका दमदार डायलॉगनं होते. "तुम्हीं ने कहा था ना कि देखते हैं पहले क्या टूटता है? मेरा भरोसा या मेरा घमंड... मेरा भरोसा ही मेरा घमंड था रे, जब वो टूट गया ना, सब टूट गया..." विश्वास आणि स्वाभिमान यांच्यातील नातं स्पष्ट करणारा तिचा संवाद लक्ष वेधून घेतो. त्यानंतर विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार आणि कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पाहायला मिळतो. लावणी आणि तमाशाच्या पारंपरिक कलाविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विठाबाईंना किती आव्हानांचा सामना करावा लागला, याची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेता झीशान अय्युब यांच्या प्रभावी आवाजातील निवेदनामुळे ट्रेलरला अधिक परिणामकारकता मिळाली आहे.
&t=28s
कोण होत्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर ?
विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्राच्या लोककलेतील एक अजरामर नाव आहे. लावणी आणि तमाशा या लोककलांना नवी उंची मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलासेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. विठाबाईंचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांचे बालपण कलावंतांच्या कुटुंबात गेले. त्यांचे वडील आणि काका ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर’ ही तमाशा मंडळी चालवत होते. या मंडळीची स्थापना त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी केली होती.
लहानपणापासूनच लावणी, गवळणी आणि तमाशाच्या वातावरणात वाढलेल्या विठाबाईंनी अगदी कमी वयातच कलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. आपल्या प्रतिभा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी तमाशा क्षेत्रात मोठे स्थान मिळवले. पारंपरिक लोककलेचे जतन करण्यासोबतच तिला व्यापक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
डिसेंबरमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ?
‘ईठा’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेत किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विठाबाईंच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास, त्यांचा संघर्ष आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एकूणच, ‘ईठा’ हा केवळ एका कलाकाराच्या जीवनावर आधारित चित्रपट नसून महाराष्ट्राच्या लावणी आणि तमाशा परंपरेचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न ठरणार आहे.




