Tuesday, September 15, 2026

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) काळाने घाला घातला. सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृत प्रल्हाद मधुकर हिवरे यांचे शीर धडापासून वेगळे झाले.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रावेर तालुक्यातील अजंदे येथील प्रल्हाद हिवरे (वय ४०) आणि ईश्वर नामदेव पवार (वय ३८) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडी १८५८ वरून मलकापूरहून अजंदे गावाकडे परतत होते. दरम्यान, नायगाव फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद ७५३ या मार्गावर काम सुरू असताना बीएनए कंपनीच्या सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. तर ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भीषण अपघातामुळे अजंदे गावावर शोककळा पसरली असून, प्रल्हाद हिवरे यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >