Nashik : सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता सर्वसामान्य नागरिकच नाही तर कलाकार, उद्योगपती यासंह सरकारी अधिकाऱ्यांनाही आता हे सायबर भामटे लक्ष करत आहे. याचाच प्रत्यय आता नाशिकमध्ये आला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Nashik Collector Ayush Prasad) यांच्या नावाने चक्क बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Nashik Cyber Crime)
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार थायलंडमधील +66 92 455 6074 या क्रमांकाचा वापर करून हे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले आहे. संबंधित अकाउंटवर व्यावसायिक खाते (Business Account) असे दर्शविण्यात येत आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Nashik Collector Ayush Prasad) यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यात आले असून, त्यांच्या पदाचा गैरवापर करून परदेशी क्रमांकावरून थेट नागरिकांना संदेश पाठवला जात असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे नाशिकसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा संशयास्पद संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Cyber Crime)
Hello... Where are you at the moment ?
या बनावट अकाउंटवरून “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या संदेशांद्वारे संबंधित व्यक्तींशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) उद्देशाने केला जात आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, या अकाउंटमागे नेमका कोणाचा हात आहे आणि संपर्क साधण्यामागील उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Nashik Cyber Crime)
नागरिकांना आवाहन
दरम्यान, नागरिकांनी या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना अथवा दूरध्वनीला प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे खाते अधिकृत नसून, संशयास्पद संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये. अशा प्रकारचा संपर्क आढळल्यास संबंधित यंत्रणेला तत्काळ माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचेही व्हॉट्सॲप अकाउंट सायबर भामट्यांकडून लक्ष केले गेल्याने खळबळ उडाली आहे.







