Tuesday, September 15, 2026

Nashik : नाशिकमध्ये मोदकांच्या २५ व्हरायटी, गोल्डन मोदकांनी वेधले लक्ष; किलोचा दर तब्बल २७ हजार रुपये

Nashik : नाशिकमध्ये मोदकांच्या २५ व्हरायटी, गोल्डन मोदकांनी वेधले लक्ष; किलोचा दर तब्बल २७ हजार रुपये

Nashik : गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून, गणरायाच्या नैवेद्यासाठी मोदक आणि मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिकांची मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यंदा पारंपरिक मोदकांसोबतच विविध नावीन्यपूर्ण प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, सोन्या-चांदीच्या वर्खाचा वापर केलेले मोदक ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. (Nashik News)

गणेशोत्सवानिमित्त मोदकांच्या २५ व्हरायटी

गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तळणीचे, उकडीचे, अंजीर, केसर, आंबा, मोतीचूर, खोबरा-मावा, ड्रायफ्रुट्स, पिस्ता-काजू यांसह सोन्या-चांदीच्या वर्खाचे मोदक खरेदी केले जात आहेत. याशिवाय बिस्कॉफ, ब्लूबेरी आणि खसखस रोल यांसारखे हटके प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. नाशिकमधील सागर स्वीट्समध्ये गणेशोत्सवानिमित्त मोदकांच्या जवळपास २५ व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पारंपरिक चवींसोबतच नवीन प्रकारच्या मोदकांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे दुकानाचे संचालक दीपक चौधरी यांनी सांगितले. येथे मोदकांचे दर ७५० रुपये किलोपासून ते २७ हजार रुपये किलोपर्यंत आहेत. ड्रायफ्रुट्समधील एक किलो वजनाचा एक मोठा मोदक १,८४० रुपयांना उपलब्ध आहे, तर अंजीर मोदकाचा दर १,४०० रुपये किलो आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे मोदक म्हणजे २७ हजार रुपये किलो दराचे गोल्डन मोदक. सोन्याचा वर्ख असलेला एक मोदक तब्बल ५४० रुपयांना मिळत आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी जवळपास १० किलो गोल्डन मोदकांची विक्री झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. (Nashik News)

२४ कॅरेट सोन्याच्या वर्खामुळे वाढले दर

गोल्डन मोदकांवर वापरला जाणारा वर्ख हा २४ कॅरेट अस्सल सोन्याचा असल्याने आणि सोन्याच्या दरात वाढ झाल्याने या मोदकांच्या किमती वाढल्या आहेत. आकर्षक स्वरूपामुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात असले तरी, हे मोदक खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सोन्याच्या वर्खासोबतच चांदीच्या वर्खाचा वापर केलेल्या सिल्व्हर मोदकांच्या किमतीतही वाढ झाली आहे. चांदीचे दर वाढल्याचा परिणाम या मोदकांच्या विक्री दरावर झाला आहे. चांदीचा वर्ख असलेले काजू मोदक २ हजार रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. पारंपरिक मोदकांपासून ते विविध नावीन्यपूर्ण चवींच्या मोदकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झाल्याने गणेशोत्सवाच्या काळात नाशिकमधील मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची लगबग वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >