Friday, October 30, 2026

Anand Paranjape: महायुतीत समन्वयाची गरज; मित्र पक्षांनी परस्परांवर आरोप टाळावेत

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर टीका करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. तसेच, महायुतीत समन्वय राखण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असून शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे: महायुतीमधील घटक पक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवावी आणि परस्परांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

परांजपे यांच्या मते, वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या बैठकांमध्ये समन्वयाबाबत योग्य तो संवाद साधला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात यावर चर्चा होऊन मार्ग निघेल. मित्र पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी सार्वजनिक वक्तव्य करताना भाषेची मर्यादा पाळली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांना व प्रवक्त्यांना मित्र पक्षांवर टीका न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दरम्यान, शेतकरी प्रश्नांवर बोलताना शिवसेना बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे परांजपे यांनी नमूद केले. यंदाच्या दसरा मेळाव्यापासूनच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. 180 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये 4 लाख 60 हजार दिवाळी शिधा वाटपाचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून पार पडले आहे. तसेच माता भगिनींसाठी 25 हजार शिलाई मशीन आणि 25 हजार सायकलींचे वाटप केले जात असून, गरजू मुलींच्या सामुदायिक विवाहांचे आयोजनही केले जात आहे. नैसर्गिक संकटात आणि दुष्काळात नेहमीप्रमाणे शिवसेना सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अग्रेसर राहिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >