Wednesday, September 16, 2026

Chhatrapati Sambhajinagar Crime : नातेवाईकासोबत बोलल्याचा राग, घटस्फोटित पत्नीचे केस कापले अन्..., छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime : नातेवाईकासोबत बोलल्याचा राग, घटस्फोटित पत्नीचे केस कापले अन्..., छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात घटस्फोटित पत्नीला मारहाण करून तिचे केस कापल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी एका नातेवाईकासोबत बोलल्याचा राग मनात धरून विभक्त पतीने कुटुंबीयांसह मध्यरात्री पत्नीच्या घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. मारहाणीवेळी महिलेचे केस कात्रीने कापून तिचे टक्कल करण्यात आले. याप्रकरणी विभक्त पती, त्याचा भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकासोबत बोलल्याचा राग

पीडित आयशा या त्यांच्या बहिणीसोबत खुलताबाद येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची योगायोगाने नणंदेच्या पतीसोबत भेट झाली. दोघे बोलत असताना आयशा यांच्या विभक्त पतीने त्यांना पाहिले. तक्रारीनुसार, आयशा एका नातेवाईकासोबत बोलत असल्याचा राग विभक्त पतीच्या मनात होता. याच कारणातून पुढे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मध्यरात्री घरात घुसून मारहाण

शनिवार, १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता विभक्त पती आपल्या भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाइकासह आयशा यांच्या हर्सूल परिसरातील घरी पोहोचला. घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी आयशा आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी नणंदेने आयशा यांना पकडून ठेवले आणि त्यानंतर कात्रीने त्यांच्या डोक्यावरील केस कापण्यात आले. तक्रारीनुसार, आयशा यांचे टक्कल करून त्यांना विद्रूप करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला.

बेल्टने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार

मारहाणीच्या वेळी विभक्त पतीने चामड्याचा बेल्ट काढून आयशा यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. याचवेळी विभक्त पतीने ‘तू माझ्यासोबत राहिली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिल्याचाही आरोप आयशा यांनी केला आहे. आयशा आणि त्यांच्या बहिणीने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर शेजारी आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. नागरिकांची गर्दी होत असल्याचे लक्षात येताच आरोपी तेथून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर जखमी आयशा यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हर्सूल पोलिसांत गुन्हा दाखल

उपचार घेतल्यानंतर आयशा यांनी १४ सप्टेंबर रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभक्त पती, त्याचा भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाईकाविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >