Tuesday, September 15, 2026

 Cafe Mondegar : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन; कुलाब्यातील प्रसिद्ध कॅफे मोंडेगारचा परवाना निलंबित

 Cafe Mondegar : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन; कुलाब्यातील प्रसिद्ध कॅफे मोंडेगारचा परवाना निलंबित

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान कुलाबा येथील प्रसिद्ध कॅफे मोंडेगारमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित काही त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे एफडीएकडून संबंधित रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान रेस्टॉरंटमधील अन्न साठवणूक, अन्न हाताळणी, स्वच्छता आणि स्वयंपाकघरातील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी गरम अन्न आवश्यक तापमानात ठेवले जात नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. गरम अन्न 60°C पेक्षा जास्त तापमानात ठेवणे आवश्यक असताना त्याचे पालन होत नसल्याचे तपासणीत आढळले. तसेच शीतगृहातील तापमानही 5°C पेक्षा कमी ठेवले जात नसल्याचे समोर आले.

याशिवाय खाद्यपदार्थ वितळवण्याची योग्य पद्धत वापरली जात नसल्याचे आणि शिजवलेले अन्न आवश्यक पद्धतीने वेगाने थंड केले जात नसल्याचेही तपासणीदरम्यान आढळले. स्वयंपाकघरातील काही उपकरणांची योग्य प्रकारे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात नसल्याचेही अधिकाऱ्यांनी नोंदवले.

तपासणी पथकाला फरशीला ओलाव्यामुळे नुकसान झाल्याचे तसेच अन्न तयार करण्याच्या परिसरात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले. या परिस्थितीमुळे अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी नोंद तपासणीदरम्यान करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर जेवणासाठी जात असल्याने खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासण्यासाठी विभागाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य आस्थापनांवर कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा