Wednesday, September 16, 2026

Devendra Fadnavis : नवोन्मेषाच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नवोन्मेषाच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन व्हिजनचे जागतिक व्यासपीठावर सादरीकरण

मुंबई : महाराष्ट्राला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्थेचे केंद्र बनवत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. सिंगापूरमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशातून महाराष्ट्राचे स्टार्टअप, इनोव्हेशन आणि प्रगत तंत्रज्ञानाविषयीचे धोरण जागतिक समुदायासमोर मांडण्यात आले. (Devendra Fadnavis)

स्टार्टअप आणि इनोव्हेशनला चालना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन मांडताना नवोन्मेष, इनक्युबेशन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापक आर्थिक परिणाम साधण्यावर भर दिला. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि युवा नवोन्मेषक यांना एका सक्षम परिसंस्थेत जोडून महाराष्ट्राला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील इनोव्हेशन हब बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत आशियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ सहभागी झाले. यंदाच्या परिषदेत एंटरप्राइज एआय आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवसायांमध्ये वापर हा प्रमुख विषय होता.(Devendra Fadnavis)

AI, सायबर सुरक्षा आणि डीप-टेकवर भर

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. त्यांनी महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्था, युवा नवउद्योजकांसाठीच्या योजना, इनक्युबेशन सुविधा, डीप-टेक क्षेत्रातील संधी आणि राज्यातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या धोरणाची माहिती दिली.(Devendra Fadnavis)

कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डीपफेक प्रतिबंधक तंत्रज्ञान, फिनटेक, क्लीनटेक आणि रोबोटिक्स यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे स्थान मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र-सिंगापूर सहकार्याच्या संधी

स्टार्टअप्स, नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञान, इनक्युबेशन, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणी या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि सिंगापूरदरम्यान सहकार्याच्या संधी असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आशियातील विविध देशांनी परस्पर सहकार्य वाढवावे आणि इनक्युबेशन परिसंस्था अधिक मजबूत करावी, असे आवाहन परिषदेत करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय नेटवर्क, तंत्रज्ञान आणि बाजारपेठांशी जोडण्याच्या दृष्टीने या व्यासपीठाचे महत्त्व अधोरेखित झाले. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >