Wednesday, September 16, 2026

Chandrashekhar Bawankule : ‘सेवा संकल्प अभियाना'तून वंचित घटकांना योजनांचा लाभ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Chandrashekhar Bawankule : ‘सेवा संकल्प अभियाना'तून वंचित घटकांना योजनांचा लाभ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज आणि इतर वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. (Chandrashekhar Bawankule)

अभियानाच्या तयारीसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हास्तरीय यंत्रणेने गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक दाखले उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)

‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेवर भर

अनुसूचित जाती-जमातीतील १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाने पुढाकार घ्यावा. आवश्यक निधीची तफावत जिल्हा नियोजन समिती किंवा संबंधित विभागाच्या निधीतून भरून काढून पात्र कुटुंबांना योजनेचा पूर्ण लाभ देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. (Chandrashekhar Bawankule)

गरजूंना धान्य, वनहक्क दाव्यांना गती

ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याची आवश्यकता नाही, त्यांच्या संमतीने आणि नियमांनुसार हे धान्य गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असेही त्यांनी सांगितले.

वनहक्क दाव्यांच्या कार्यवाहीसाठी १७ ते १९ सप्टेंबरला ग्राम समित्यांच्या बैठका, ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ग्रामसभा, ८-९ ऑक्टोबरला उपविभागीय समिती आणि १६-१७ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय समितीच्या बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वनहक्क पट्टे मिळालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्याची कार्यवाहीही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Chandrashekhar Bawankule)

पांदण रस्त्यांना क्रमांक, अतिक्रमणधारकांना पट्टे

अभियानांतर्गत पांदण रस्त्यांना क्रमांक देऊन त्यांचे ग्रीड तयार करावे. नवीन पात्र रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देशही देण्यात आले.

तसेच १ जानेवारी २०११ पूर्वी रहिवासी किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना नियमांनुसार पट्टे देण्याची कार्यवाही करावी. अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. (Chandrashekhar Bawankule)

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच रिक्त पदांची मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवून बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. (Chandrashekhar Bawankule)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >