मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात (Ganeshotsav 2026) संपूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची अलोट गर्दी जमू लागली आहे. या सर्व आकर्षणात गणेश गल्लीतील प्रसिद्ध 'मुंबईचा राजा' च्या (Mumbaicha Raja, Ganesh Galli) यंदाच्या रूपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या बाप्पाची पहिली झलक दाखवली आणि पाहता पाहता या मूर्तीची चर्चा सर्वत्र सुरू झाली. लालबागच्या गणेश गल्लीतील या ऐतिहासिक मंडळाचे यंदा ९९ वे वर्ष आहे. शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या या मंडळाने यंदा अत्यंत अद्वितीय संकल्पना साकारली आहे. एका मोठ्या गुलाबी सुगंधी फुलावर बाप्पा केवळ एका पायावर संतुलित उभा असलेला दिसतो. या फुलाच्या खालून एक निळ्या रंगाचा विशाल हात वर आला असून, त्यानेच या पूर्ण रचनेचा भार पेलल्याचा एक अद्भुत भास होतो.
बाप्पाचे हे रूप नेहमीप्रमाणेच अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे. पारंपरिक धोतर, छातीवर सोन्याचे दागिने अन् शिरावर नक्षीदार सुवर्णमुकुट अशा थाटात बाप्पा विराजमान झाला आहे. परंतु, यंदा या भव्यतेपेक्षाही बाप्पाच्या एका विशिष्ट हाताच्या मुद्रेने सोशल मीडियावर आणि भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
बाप्पा खरोखरच 'कोरियाई फिंगर हार्ट' करतोय का ?
भरतनाट्यममधील 'कटकामुख मुद्रेचा' खरा अर्थ काय?
भारताच्या प्राचीन भरतनाट्यम या नृत्यप्रकारात अनेक प्रकारच्या हस्तमुद्रा सांगितल्या गेल्या आहेत, त्यापैकीच 'कटकामुख मुद्रा' ही एक प्रमुख असंयुक्त (एका हाताने केली जाणारी) मुद्रा आहे. यामध्ये अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकत्र आणून ही विशिष्ट रचना केली जाते. आधुनिक कोरियन फिंगर-हार्टचा थेट अर्थ 'आय लव्ह यू' असा होत असला, तरी प्राचीन कटकामुख मुद्रेचा संदर्भ परिस्थितीनुसार बदलतो. केवळ प्रेम व्यक्त करण्यापुरता याचा वापर मर्यादित नसतो. शास्त्रीय परंपरेनुसार या मुद्रेचा उपयोग फुले तोडणे किंवा मोत्यांची माळ धारण करणे, धनुष्याची दोरी ताणणे, विड्याचे पान अर्पण करणे किंवा सुगंधी उटी/गंध लावणे, संवाद साधणे आणि पाहणे यासाठी केला जातो.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या मुद्रेचा उद्देश बाप्पाचा भक्तांशी असलेला संवाद आणि तिची प्राचीन समृद्ध परंपरा दाखवणे हाच आहे. त्यामुळे जरी ही मुद्रा आजच्या तरुणांना कोरियन हार्टसारखी वाटत असली, तरी त्यामागे भारतीय शास्त्रीय नृत्याचा अत्यंत जुना आणि समृद्ध वारसा दडला आहे. १९२८ मध्ये स्थापन झालेले लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्ली) हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या मंडळांपैकी एक आहे. नेहमी काहीतरी नवीन आणि भव्य साकारणाऱ्या या मंडळाने यंदा ९९ व्या वर्षात या अनोख्या मुद्रेच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि आधुनिकतेचा एक सुंदर मिलाफ साधला आहे.