मुंबई : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेने समाजमाध्यमांवरून हटविल्यानंतर या प्रकरणावरून नव्या चर्चांना तोंड फुटले. या व्हिडिओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर पालिकेने ही कारवाई केली. दरम्यान, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सल्ला देणाऱ्यांनी ईद, मोहरम आणि बकरी ईदच्या वेळीही अशाच प्रकारचे आवाहन करावे, अशी टीका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जनजागृती मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झासह विविध क्षेत्रांतील व्यक्तींना सहभागी करून घेतले होते. या मोहिमेअंतर्गत दिया मिर्झाने व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना दिवाळीत फटाके न फोडण्याचे तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, या संदेशावर अमित साटम यांनी आक्षेप घेतला. ‘दिवाळी कशी साजरी करावी, हे आम्हाला दिया मिर्झाकडून शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृतीशी सण जोडलेले आहेत,’ अशी भूमिका त्यांनी समाजमाध्यमांवर मांडली. पालिकेच्या सोशल मीडिया खात्यालाही त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केले होते. त्यानंतर काही तासांतच पालिकेने दिया मिर्झाचा व्हिडिओ आपल्या समाजमाध्यम खात्यांवरून हटविला.
मुंबई : "जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदर विकास क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने धोरणात्मक ...
याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्री नितेश राणे म्हणाले, दिया मिर्झा दिवाळीच्या वेळी फटाके न फोडण्याचे आवाहन करते; मात्र ईद, मोहरम किंवा बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याबाबत ती अशी भूमिका मांडत नाही. होळीच्या वेळीही पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा सल्ला दिला जातो. मग रमजान आणि बकरी ईदच्या वेळीही पर्यावरणपूरकतेचा संदेश द्यायला नको का? अशा व्यक्ती सनातन हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.