मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये राज्यातील सर्व 7 विभागांमधील 114 अन्न व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 19.01 कोटी रुपये किमतीचा सुमारे 3.53 लाख किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. गंभीर त्रुटी आढळलेल्या अन्न व्यावसायिकांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.
खाद्यतेल, मसाले आणि मिठाईचा मोठा साठा जप्त
FDA च्या तपासणीत खाद्यतेल, मसाले, तांदूळ, डाळी, गूळ, तूप, मिठाई, नमकीन, सुकामेवा, बेकरी उत्पादने आणि इतर अन्नपदार्थांचा समावेश असलेला साठा जप्त करण्यात आला. कोकण विभागातील भिवंडी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. या आस्थापनातून 1,44,218 किलो खाद्यतेलाची सर्वात मोठी एकल जप्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे मिथ्याछाप किंवा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून 2,279.7 लिटर पतंजली गाईचे तूप जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत 1.20 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अस्वच्छता आणि नियमभंगामुळे परवाने निलंबित
बृहन्मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील नमकीन, मिठाई आणि मसाले उत्पादक आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी खाद्यतेलाच्या पुनर्पॅकिंगसाठी जुन्या डब्यांचा वापर, अन्नपदार्थांमध्ये रंगाचा वापर, चुकीचे लेबलिंग आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळून आला. रवी ऑईल इंडस्ट्रीजच्या अचानक तपासणीत 86 पैकी केवळ 30 गुण मिळाले. प्रयोगशाळा अहवाल, फूड-ग्रेड पॅकिंग प्रमाणपत्रे आणि स्वच्छतेच्या आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सोन्या-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या ...
13 एफआयआर; 16 जणांना अटक
28 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात सघन कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये 13 एफआयआर दाखल करण्यात आले, 16 व्यक्तींना अटक करण्यात आली, 7 आस्थापना सीलबंद करण्यात आल्या आणि 6 वाहने जप्त करण्यात आली.
TATA 1mg आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही नोटीस
TATA 1mg च्या Marine Collagen Powder उत्पादनाच्या लेबलिंग आणि जाहिरातींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून FSSAI ने संबंधित उत्पादक, विपणनकर्ता तसेच Amazon आणि Flipkart यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्वचा, केस, नखे आणि सांध्यांसाठी केलेले दावे, उत्पादनाच्या श्रेणीचे लेबलिंग आणि तुलनात्मक जाहिराती याबाबत आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
नागरिकांना FDA चे आवाहन
नागरिकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. पॅकिंगवरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि Best Before तपशील तपासावेत. संशयास्पद किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास FDA च्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.