Gauri Avahan 2026 : “आली आली गौराई, सोन्याच्या पावलांनी…” या पारंपरिक गीताच्या सुरांनी आज महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सव सुरू असतानाच आता घराघरांत ज्येष्ठागौरी अर्थात गौराईच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. पंचांगानुसार, यंदा ज्येष्ठागौरी उत्सवाला गुरुवार, १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून १९ सप्टेंबरला गौरी विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. गौराईचं आवाहन कधी करायचं, पूजेचा मुहूर्त कोणता, नैवेद्यात काय पदार्थ केले जातात आणि या उत्सवाचं धार्मिक महत्त्व काय आहे, जाणून घेऊया...
गौराई आवाहनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठागौरीचे आवाहन करण्याची परंपरा आहे. आज, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत गौराईचे आवाहन करणे शुभ मानले जात आहे. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. गौराईचं घरात आगमन करताना अनेक ठिकाणी रांगोळी काढून, हळद-कुंकू लावून, औक्षण करत आणि मंगलवाद्यांच्या नादात त्यांचं स्वागत केलं जातं. काही कुटुंबांमध्ये गौराईला घरातील धान्य, धन-दौलत आणि स्वयंपाकघर दाखवण्याचीही परंपरा आहे. मात्र, या प्रथा कुलाचार आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या असू शकतात.
तीन दिवसांचा ज्येष्ठागौरी उत्सव
१७ सप्टेंबर – गौरी आवाहन या दिवशी गौराईचं घरात आगमन करून त्यांची स्थापना केली जाते.
१८ सप्टेंबर – ज्येष्ठागौरी पूजन हा पूजेचा मुख्य दिवस. या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. अनेक कुटुंबांमध्ये सवाष्ण आणि कुमारिकांचं पूजन तसेच हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो.
१९ सप्टेंबर – गौरी विसर्जन घरच्या परंपरेनुसार पूजा-अर्चा करून गौराईला निरोप दिला जातो आणि विसर्जनाने तीन दिवसीय उत्सवाची सांगता होते.
येत्या २५ सप्टेंबर होणार संस्थेची निवड, विविध संस्थांकडून मागवले स्वारस्य अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित ...
गौराईला कोणता नैवेद्य दाखवतात ?
गौराईच्या नैवेद्याची एकच ठरावीक पद्धत नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये आणि घरच्या कुलाचारानुसार नैवेद्याचे पदार्थ बदलतात. मात्र पुरणपोळीला गौरीपूजनातील मानाचा आणि सर्वाधिक प्रचलित गोड नैवेद्य मानलं जातं.
नैवेद्यात प्रामुख्याने
- पुरणपोळी
- १६ भाज्या किंवा विविध भाज्यांची भाजी
- कटाची आमटी
- वरण-भात
- अळूवडी
- खीर, लाडू, करंजी यांसारखे गोड पदार्थ
- फळे आणि पंचामृत
अशा विविध पदार्थांचा समावेश केला जातो.
ज्येष्ठागौरी पूजनाचं धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठागौरीला महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि सौख्य नांदावं, या श्रद्धेने गौराईचं आवाहन आणि पूजन केलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या या उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबतच कौटुंबिक आणि सांस्कृतिक महत्त्वही मोठं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आजपासून गौराईच्या स्वागताची लगबग सुरू होणार आहे.






