Saturday, September 19, 2026

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह ! अभियंता तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, कारण अस्पष्ट

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह ! अभियंता तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, कारण अस्पष्ट

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या २८ वर्षीय अभियंत्याने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात बजरंग बोगद्याजवळ घडली आहे. गौरव हरिश्चंद्र देशमुख (रा. गणेश कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गौरवने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

बजरंग बोगद्याजवळ पोहोचला अन्...

गौरव देशमुख व्यवसायाने अभियंता होता. त्यासोबतच तो बांधकाम मक्तेदारीचे कामही करत होता. नेहमीप्रमाणे तो दिवसभर कामावर होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो बजरंग बोगद्याच्या परिसरात पोहोचला. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण बारी आणि गणेश राजपूत घटनास्थळी दाखल झाले. गौरवला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

तुटलेल्या मोबाईलमुळे पटली ओळख

घटनास्थळी पोलिसांना गौरवचा तुटलेला मोबाईल सापडला. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून त्यातील संपर्क क्रमांकांच्या आधारे संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर मृत तरुणाची ओळख गौरव देशमुख अशी पटली.

16 ऑगस्टला झाला होता विवाह

गौरवचा विवाह 16 ऑगस्ट रोजी झाला होता. लग्नाला अवघा महिनाभर होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने देशमुख कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी गौरवने पत्नी आणि कुटुंबीयांसोबत बसून लग्नाचा अल्बमही पाहिला होता. गुरुवारी रात्री तो गणेश मंडळाच्या ठिकाणीही गेला होता. तेथे मित्र आणि परिसरातील तरुणांसोबत तो नाचला. त्यानंतर काही वेळातच तो बजरंग बोगद्याच्या दिशेने गेला आणि ही घटना घडली.

अचानक काय घडले ?

काही तासांपूर्वीपर्यंत कुटुंबीय आणि मित्रांसोबत सामान्यपणे वावरणाऱ्या गौरवने अचानक हे पाऊल का उचलले, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. गौरव हा देशमुख कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हरिश्चंद्र देशमुख हे देखील अभियंता असून, वडील आणि गौरव दोघेही बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. घरची परिस्थिती चांगली असतानाही या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.  या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गौरवच्या मोबाईलमधील माहिती तसेच घटनेपूर्वीच्या काही तासांतील त्याच्या हालचालींचा तपास केला जात आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >