Saturday, September 19, 2026

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाचा घाला; रांगेतच प्राण सोडल्याने हळहळ

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाचा घाला; रांगेतच प्राण सोडल्याने हळहळ

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी जळगावहून मुंबईत आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाची दर्शनाची आस अखेरची ठरली. दर्शनाच्या रांगेत उभा असताना अचानक प्रकृती बिघडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की लालबागच्या राजाचं दर्शन हे अनेक भाविकांचं स्वप्न असतं. राज्याच्या विविध भागांतून भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होतात. तासन्तास रांगेत उभं राहून भाविक आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेतात. मात्र, याच भक्तीमय वातावरणात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.(Ganeshotsav Mumbai)

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील जयदीप मेघराज नेमाडे हा २५ वर्षीय तरुण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. जयदीप हा ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित होता. गुरुवारी रात्री तो दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. काही वेळातच त्याची प्रकृती खालावली.(Ganeshotsav Mumbai)

जयदीपची प्रकृती बिघडल्याचं लक्षात येताच मंदिरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत केली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, जयदीपचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेला जयदीप पुन्हा घरी परतलाच नाही. त्याच्या निधनामुळे जळगाव परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.(Ganeshotsav Mumbai)

दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिसांकडून व्यवस्था केली जाते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या घटनेमुळे गणेशोत्सवातील गर्दीत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत तत्परतेने उपलब्ध असणं किती महत्त्वाचं आहे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.(Ganeshotsav Mumbai)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >