Sunday, September 20, 2026

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोशी जोडणारा पहिला फ्लायओव्हर कधीपासून सुरू होणार?

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोशी जोडणारा पहिला फ्लायओव्हर कधीपासून सुरू होणार?
मुंबई: मुंबईमध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक घट्ट केली जात आहे. मेट्रो कॉरिडॉरशी जोडलेला पहिला उड्डाणपूल लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. अंधेरी पश्चिमेतील इन्फिनिटी मॉल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंतचा पहिला टप्पा येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तर, पूनम नगरपर्यंतचा पुलाचा उर्वरित भाग मे २०२७ पर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) प्रस्तावित केलेला ५.०८ किमी लांबीचा हा उड्डाणपूल, अंधेरी पश्चिमेतील न्यू लिंक रोडवर असणाऱ्या इन्फिनिटी मॉलपासून जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील (जेव्हीएलआर) पूनम नगरशी जोडला जाणार आहे. एकूण लांबीपैकी ०.९३ किमीचे बांधकाम महानगरपालिकेकडून आधीच करण्यात आले आहे. प्रस्तावित उड्डाणपुलाचा मार्ग मेट्रो लाईन ६ च्या मार्गावर येत असल्यामुळे, बीएमसीने उर्वरित बांधकामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपवली आहे. उड्डाणपूलाचे काम बीएमसीकडे तर, मेट्रो मार्गिका ६ चे काम एमएमआरडीएकडे अशा दोन वेगवेगळ्या दोन क्षेत्रामध्ये विभागलेय.
२.५८ किमी लांबीचा पहिला टप्पा मेट्रो लाईन ६ सोबत दुमजली रचनेच्या स्वरूपात उड्डाणपूल बांधला जाणार आहे. सध्याच्या घडीला या उड्डाणपुलाचं ८०% प्रत्यक्ष काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा, जो १.५८ किमी लांबीचा आहे. तिथे फक्त उड्डाणपुलाचं काम शिल्लक आहे. रॅम्पच्या स्वरूपामध्ये उड्डाणपुलाची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि कार्यरत मेट्रो लाईन ७ ओलांडणाऱ्या १२० मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजचा समावेश आहे. या विभागातील काम सुद्धा सध्या प्रगती पथावर आहे. इन्फिनिटी मॉल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंतचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, तर केबल-स्टेड ब्रिजसह जेव्हीएलआर जंक्शन ते पूनम नगरपर्यंतचा दुसरा टप्पा मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
संपूर्ण उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर एलिव्हेटेड कॉरिडोर रोड मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व भागांना सुविधा प्रदान करेल. या रोडमुळे इन्फिनिटी मॉल जंक्शन, एसव्ही रोड जंक्शन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आणि जेव्हीएलआर जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी कमी करेल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे लिंक रोड, एसव्ही रोड आणि जेव्हीएलआर रोड दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच विविध उन्नत स्तरांवरून जाणारी स्थानिक आणि थेट वाहतूक वेगळी केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >