मॉस्को : युक्रेनने रशियावर १,००० हून अधिक ड्रोनच्या मदतीने भीषण हल्ला केला आहे. रशियात संसदीय निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम दिवस सुरू असतानाच हा हल्ला झाला. मॉस्कोसह देशाच्या विविध भागांना लक्ष्य करण्यात आलेला हा हल्ला, राजधानीवर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.(Ukraine Russia Conflict)
मॉस्कोमध्ये मोठे नुकसान, दोन जणांचा मृत्यू
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी हा राजधानीवरील ‘अभूतपूर्व हल्ला’ असल्याचे म्हटले असून, निवडणुकीत अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, "शत्रू यात अपयशी ठरला," असे ते म्हणाले. या हल्ल्यामध्ये मॉस्को ऑइल रिफायनरी आणि एका निवासी इमारतीचे नुकसान झाले आहे. मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांच्या माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यात एका ७४ वर्षीय पुरुषासह ४४ वर्षीय महिलेचा असा एकूण दोन जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत.(Drone Attack)
मुंबई : काळाचौकी महागणपती मंडळाच्या परिसरात घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेनंतर सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केईएम ...
युक्रेनचा हेतू आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे स्पष्टीकरण
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, या हल्ल्यात युक्रेनमध्ये निर्मित 'फ्लेमिंगो' आणि 'पेलिकन' क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. रशियाच्या युद्धयंत्रणेला आर्थिक नुकसान पोहोचवणे हा या हल्ल्यांचा मुख्य उद्देश असून, याद्वारे तेल आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.
रशियाकडून १,१०० ड्रोन नष्ट केल्याचा दावा
दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांच्या लष्कराने देशभरात तसेच क्रिमिया आणि काळ्या समुद्रावरून उड्डाण करणारे तब्बल १,१०० युक्रेनियन ड्रोन यशस्वीरित्या पाडले आणि नष्ट केले. केवळ मॉस्कोच्या दिशेने येणारे ४५० ड्रोन रशियन सैन्याने आकाशातच उडवून दिल्याचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले.(Drone Attack)
युद्धकालीन संसदीय निवडणूक आणि इतर घडामोडी
रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच संसदीय निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्या विरोधकांची उपस्थिती अत्यंत मर्यादित राहिली आहे. विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनमधील विलीनीकरणाचा दावा केलेल्या चार प्रदेशांमध्ये तसेच २०१४ मध्ये ताब्यात घेतलेल्या क्रिमियामध्येही या निवडणुका घेतल्या आहेत. मात्र, युक्रेनने या प्रदेशांतील मतदान पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने युक्रेनच्या कीव्हजवळील बुचा जिल्ह्यात केलेल्या भीषण हल्ल्यात ३७ जण दगावल्याची घटनाही समोर आली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.(Ukraine Russia Conflict)