Monday, September 21, 2026

Jackie Shroff : जॅकी श्रॉफ यांनी घेतले 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चे दर्शन; बाप्पाच्या चरणी रोपटं अर्पण करत जपला निसर्गप्रेम

Jackie Shroff : जॅकी श्रॉफ यांनी घेतले 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चे दर्शन; बाप्पाच्या चरणी रोपटं अर्पण करत जपला निसर्गप्रेम

मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Actor Jacky shroff) यांनी मुंबईतील अत्यंत मानाच्या आणि प्रसिद्ध अशा 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चे (Chinchpokalicha Chintamani) दर्शन घेतले. दर्शनादरम्यान त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास आणि अनोख्या शैलीत चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करत आशीर्वाद मागितले.

&
चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या जॅकी श्रॉफ यांचा लूक सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, लाल टोपी आणि गॉगल असा पारंपरिक आणि एकदम हटके पोशाख केला होता. विशेष म्हणजे, आपल्या निसर्गप्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅकी श्रॉफ यांच्या गळ्यात झाडाच्या पानांची माळ देखील होती. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना त्यांनी नेहमीप्रमाणे हातात धरलेले एक हिरवंगार रोपटं श्रींच्या चरणी भेट म्हणून ठेवलं. यानंतर मंडळाच्या आयोजकांकडून जॅकी श्रॉफ यांचा पुष्पगुच्छ, फळे आणि प्रसाद देऊन जंगी सत्कार करण्यात आला.

१९२० सालापासून सुरू झालेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे हे १०७ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी चिंतामणीची मूर्ती भगवान व्यंकटेश (तिरुपती बालाजी) यांच्या भव्य आणि नयनरम्य रुपात साकारण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांमध्ये दर्शनासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ऐतिहासिक आणि भव्य पांडालमध्ये सर्वसामान्यांसोबतच अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत असून, जॅकी श्रॉफ यांच्या या खास हजेरीने चिंतामणीच्या दरबारातील उत्साह आणखी वाढवला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >