- अजित पवार कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रातून दावा
मुंबई : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच दिवंगत अजित पवार यांना उद्देशून लिहिलेले एक भावनिक पत्र समाजमाध्यमांवर चर्चेत आले आहे. कारखान्याच्या गेल्या दोन महिन्यांतील अहवालांमध्ये विविध नेत्यांचे फोटो आणि काही पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले; मात्र खासदार पार्थ पवार यांच्या नामोल्लेखाचा अभाव असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. त्यावरून अजित पवार यांच्या आशीर्वादाने मोठे झालेले काहीजण त्यांच्या कुटुंबालाच राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा या पत्रातून करण्यात आला आहे.
‘आदरणीय स्वर्गीय अजितदादा... बघताय ना, सोमेश्वरकडे?’ तुम्ही प्रेमाने जपलेला आणि वाढवलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आज वेगळ्या राजकीय वळणावर उभा आहे. कारखान्याचे दोन वेगवेगळे अहवाल सभासदांच्या घरापर्यंत पोहोचले असून, त्यामध्ये कारखान्याचा लेखाजोखा, विविध नेत्यांचे फोटो आणि काही पदाधिकाऱ्यांचे कौतुक आहे. मात्र तालुक्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आणि संसदेत या भागातील प्रश्न मांडणाऱ्या पार्थ पवार यांचा नामोल्लेख नसल्याची खंत काही सभासद व्यक्त करीत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
'तुमच्याच आशीर्वादाने मोठे झालेले काहीजण आज तुमच्याच कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहेत का?’ असा सवाल करण्यात आला आहे. अजित पवार हयात असताना पडद्यामागे काही राजकीय डावपेच सुरू असल्याची चर्चा होती आणि सोमेश्वरच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेच राजकारण उघडपणे समोर येत असल्याची भावना काही सभासदांमध्ये निर्माण झाल्याचा दावाही पत्रातून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पक्षांतर्गत विरोधाबाबत चर्चा झाल्याचा संदर्भ देत, सोमेश्वरच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा अजित पवार कुटुंबाभोवती राजकीय हालचाली सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पत्राच्या शेवटी, ‘सोमेश्वरवर लक्ष ठेवा, कुटुंबावर लक्ष ठेवा आणि तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या,’ असे आवाहन करण्यात आले असून, ‘आज तुम्ही आमच्यात नसला तरी तुमच्या आठवणी, तुमचे काम आणि तुमच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम आहे,’ असे नमूद करण्यात आले आहे. ‘एक सोमेश्वर कारखान्याचा सभासद’ या नावाने हे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तांत्रिक बाबींचे विश्लेषण सुरू; पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, जलाशयांचा साठा आणि ‘एनडीव्हीआय’ची माहिती तपासणार मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिलेल्या ...
निवडणूक कधी ?
दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ५१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप आणि शिवसेनेकडूनही पॅनल उभारण्याची तयारी सुरू आहे. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी होणार असून, वार्षिक अहवालात पार्थ पवार यांचा फोटो नसल्याच्या मुद्द्यावरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.






