Tuesday, September 22, 2026

Rajasthan Accident : राजस्थानच्या बारांमध्ये भीषण अपघात; कार-बल्करची समोरासमोर धडक, डॉक्टर दाम्पत्यासह दोन्ही मुलांचा मृत्यू

Rajasthan Accident : राजस्थानच्या बारांमध्ये भीषण अपघात; कार-बल्करची समोरासमोर धडक, डॉक्टर दाम्पत्यासह दोन्ही मुलांचा मृत्यू

राजस्थान : राजस्थानच्या बारां जिल्ह्यात कवाई-अटरू मार्गावर मंगळवारी कार आणि बल्करची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत डॉक्टर दाम्पत्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आणि चारही जण वाहनात अडकून पडले होते. (Rajasthan Accident)

कारचा चुराडा; स्थानिकांच्या मदतीने चौघांना बाहेर काढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवाई-अटरू मार्गावर कार आणि बल्करची जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Rajasthan Accident)

डॉक्टर दाम्पत्यासह दोन्ही मुलांचा मृत्यू

या अपघातात ३८ वर्षीय डॉक्टर सुरेश गजराज, त्यांची पत्नी डॉक्टर शालिनी मार्य, मुलगी निलिशा आणि मुलगा स्वप्निल यांचा मृत्यू झाला. डॉक्टर दाम्पत्य नातेवाईकांकडे गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Rajasthan Accident)

बल्कर पोलिसांच्या ताब्यात; चालकाचा शोध सुरू

अपघातानंतर पोलिसांनी बल्कर ताब्यात घेतला असून, त्याचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कार आणि बल्करची धडक नेमकी कशी झाली, याचा तपासही केला जात आहे.

मृतदेह शवागारात ठेवण्यात आले असून, कुटुंबीयांकडून ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील. (Rajasthan Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >