Tuesday, September 22, 2026

Mumbai Cyber Crime : मुंबईत २१ वर्षीय तरुणीचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल; फोटो हटवण्यासाठी १० हजारांची मागणी

Mumbai Cyber Crime : मुंबईत २१ वर्षीय तरुणीचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल; फोटो हटवण्यासाठी १० हजारांची मागणी

बनावट अकाउंटवरून फोटो प्रसारित करून आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी; अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून एका २१ वर्षीय तरुणीचे खासगी फोटो प्रसारित करण्यात आले. हे फोटो हटवण्यासाठी १० हजार रुपये देण्याची मागणी करत, पैसे न दिल्यास आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी तरुणीने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस तपास करत आहेत. (Mumbai Cyber Crime)

नेमकं काय घडलं?

जोगेश्वरी पश्चिम परिसरात राहणारी २१ वर्षीय तरुणी एका कुटुंबाकडे लहान मुलीची देखभाल करण्याचे काम करते. १९ सप्टेंबर रोजी तिच्या होणाऱ्या पतीने फोन करून एका अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो अपलोड करण्यात आल्याची माहिती दिली. (Mumbai Cyber Crime)

तरुणीने संबंधित अकाउंट तपासले असता, त्यावर तिचे तीन फोटो आढळले. त्यापैकी एक फोटो खासगी स्वरूपाचा होता. तसेच तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा खासगी फोटोही अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर तरुणीने संबंधित अकाउंट इन्स्टाग्रामवर रिपोर्ट केले.

दुसऱ्या अकाउंटवरून १० हजारांची मागणी

पहिले अकाउंट रिपोर्ट केल्यानंतर तरुणीला दुसऱ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फॉलो रिक्वेस्ट आली. या अकाउंटवरही तिचे फोटो असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तरुणीने संबंधित व्यक्तीकडे फोटो हटवण्याची विनंती केली. मात्र, फोटो हटवण्यासाठी १० हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Mumbai Cyber Crime)

अंबोली पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकारानंतर तरुणीने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. बनावट अकाउंट तयार करून खासगी फोटो प्रसारित करणाऱ्या आणि पैशांची मागणी करणाऱ्या संबंधित व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. (Mumbai Cyber Crime)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >