Tuesday, September 22, 2026

जापानविरुद्ध श्रेयस अय्यरला मिळाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पण का?

जापानविरुद्ध श्रेयस अय्यरला मिळाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पण का?
भारत आणि जापान यांच्यात एकमेव टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारताने जापानला 2 धावांनी पराभवाची धूळ चारली. एक वेळ अशी होती की हा सामना भारतीय संघ गमावणार असंच वाटलं होतं. पण भारताने शेवटच्या क्षणी कसाबसा विजय मिळवला. पण कसाही असला तरी विजय हा विजयच असतो. भारत आणि जापान यांच्यात पावसाच्या व्यत्ययामुळे पाच षटकांचा सामना झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 32 धावा केल्या. तर जापानने 30 धावांपर्यंत मजल मारली पण 2 धावांनी विजय निसटला. पण आता श्रेयस अय्यरला प्लेयर ऑफ मॅचचा पुरस्कार दिल्याने वाद रंगला आहे. कारण श्रेयस अय्यरने फक्त 16 धावांची खेळी केली होती. असं असूनही त्याला पुरस्कार दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला मिळालेल्या पुरस्काराची नेटकरी खिल्ली उडवत आहेत.

श्रेयस अय्यरला सामनावीराचा पुरस्कार

जापानविरुद्ध भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. अभिषेक शर्मासारख्या स्टार फलंदाजही फेल गेला. त्याला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद झाला. इशान किशनच्या वाटेलाही फक्त 6 चेंडू आले आणि 3 धावा केल्या. टीम इंडियाने अवघ्या 8 चेंडूत 9 धावा करत 2 विकेट गमावल्या होत्या. त्या वेळेस कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात उतरला. संघाच्या 14 धावा असताना त्याच्यासमोबर तिसरी विकेट पडली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. 15 चेंडू शिल्लक होते. संघ अडचणीत असताना आणि फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यरने12 चेंडूत 16 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला 32 धावांपर्यंत मजल मारता आली.
श्रेयस अय्यरच्या याच खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण त्याला पुरस्कार दिल्याने श्रेयस अय्यर आणि टीम इंडियाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. कारण जापानला विजयापासून रोखण्याचं खरं काम कोणी असेल तर ते अक्षर पटेलने.. असं नेटकरी आणि क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण शेवटच्या षटकात जापानला 7 धावांची गरज होती. पण अक्षर पटेलने फक्त 5 धावा दिल्या. त्यामुळे भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला. इतकंच काय तर या सामन्यात त्याने दोन षटकं टाकली. यात त्याने फक्त 7 धावा दिल्या. पण त्याला काही विकेट मिळाली नाही. पण सामन्याची स्थिती पाहता त्याला पुरस्कार मिळायला हवा होता असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

                            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >