Saturday, November 7, 2026

मैदानावर हे सोपे नव्हते...! दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयानंतर कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?

भारताने सलग दोन वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्यासाठी एक विजय दूर आहे. यापूर्वी भारताने टी20 मालिका जिंकली होती, आता वनडेतही तोच कित्ता गिरवण्यासाठी सज्ज आहे. या विजयानंतर कर्णधार शुभमन गिलने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि दुसऱ्या सामन्यातील विजय वाटतो तितका सोपा नसल्याचं सांगितलं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि 2-0 ने आघाडी घेतली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार शुभमन गिलने घेतलेला हा निर्णय योग्य ठरला.पावसामुळे हा सामना 47 षटकांचा करण्यात आला होता. पण न्यूझीलंडचा संघ सर्व गडी गमवून 134 धावा करू शकला आणि विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान गाठताना 26 षटकात 7 गडी गमवून 113 धावांपर्यंत मजल मारली. मात्र पावसाच्या हजेरीमुळे पुढचा सामना काही होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ 4 धावांनी पुढे होता. त्यामुळे हा सामना भारताने 4 धावांनी जिंकला. या विजयानंतर शुभमन गिलने भारतीय गोलंदाजीचं कौतुक केलं. तसेच सामना जिंकणं सोपं नव्हतं हे सांगण्यासही विसरला नाही.

काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल?

कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, 'मैदानावर हे सोपे नव्हते. मला वाटते की आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांना 130-140 धावांच्या आसपास रोखणे चांगले होते. एका क्षणी आम्हाला वाटले की हे लक्ष्य सोपे असेल, पण आमच्या विकेट्स पडतच राहिल्या. शेवटी आम्ही विजय मिळवला.' गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीचं कौतुक करत शुभमन गिल म्हणाला की, 'गुरनूर, मागच्या सामन्यातही खूप चांगली गोलंदाजी करत आहे. आशा आहे की, जसजसे तो अधिक सामने खेळेल आणि त्याला अधिक अनुभव मिळेल, तसतसा त्याचा लाईन आणि लेंथ अधिक सातत्यपूर्ण होईल. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे उसळी आहे. तो किती सातत्य राखू शकतो यावर सर्व अवलंबून आहे आणि जर तो अशीच गोलंदाजी करत राहिला तर तो किती गुणवत्ता आणतो हे आपण आज पाहिले.'

खेळपट्टी आव्हानात्मक होती...

कर्णधार शुभमन गिल खेळपट्टीबाबत म्हणाला की, 'खेळपट्टी नक्कीच आव्हानात्मक होती. पण मला वाटतं की शेवटी आम्ही अपेक्षेपेक्षा दोन जास्त विकेट्स गमावल्या. आम्हाला माहित होतं की शेवटी पाऊस येऊ शकतो. आणि आम्ही खेळलेले शेवटचे दोन फटके... ते योग्य दिसत नाहीत. जर आम्ही हा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार चार-पाच धावांनी हरलो असतो, तर ते आमच्यासाठी नक्कीच खूप वाईट ठरलं असतं. पण सामना जिंकल्याचा आनंद आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >