महापालिका सभागृहनेत्यांनीही कारवाईला स्थगिती देण्याची केली आयुक्तांकडे मागणी
यापूर्वी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या कारवाईला केला होता विरोध
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईतील 14 फुटांच्या वरील झोपड्यांवरील बांधकामांवर हातोडा चालवण्याची मोहिम जाहीर केली. मात्र, ही मोहिम जाहिर करताच याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केल्यानंतर आता सत्ताधारी भाजपनेही विरोध केला आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून मुंबईकर रहात असून, मुंबई महानगरपालिकेतर्फे या विषयामध्ये गरीब मुंबईकरांना त्रास होईल असे मुंबई महानगरपालिकेकडून कुठलेही पाऊल उचलले जाणे अपेक्षित नसून, आपण या संदर्भात जर अशा काही सूचना दिल्या असतील तर त्याला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी भाजपचे गटनेते आणि महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की,प्रशासनाच्यावतीने मुंबई शहरातील झोपडपट्टी क्षेत्रातील 14 फूटाच्यावर असलेल्या झोपडयांना नोटीसा देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 40 टक्के मुंबई ही झोपडपट्टी क्षेत्रामध्ये मोडते. महाराष्ट्र शासनाने एसआरए मार्फत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध ठिकाणी क्लस्टर योजनांच्या तसेच, अन्य योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून, युध्द पातळीवर मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडुन करण्यात येत आहेत.
मुंबईमध्ये अनेक वर्षापासून मुंबईकर रहात असून, मुंबई महानगरपालिकेतर्फे या विषयामध्ये गरीब मुंबईकरांना त्रास होईल असे मुंबई महानगरपालिकेकडून कुठलेही पाऊल उचलले जाणे अपेक्षित नाही. आपण या संदर्भात जर अशा काही सूचना दिल्या असतील तर त्याला त्वरित स्थगिती द्यावी. तसेच, धोकादायक असलेल्या झोपडपट्टी क्षेत्रातील काही बांधकामे ज्याच्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता असेल अशा बांधकामावरच आपण योग्य ती पाऊले उचलावी व आपण अशा प्रकारच्या नोटीसा सरसकट देऊ नये. असे झाल्यास मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो व गरीब मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू शकतो याची नोंद घ्यावी, असा भीतीवजा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात जोरदार प्रतिक्रिया देत मुंबईतील 39 हजार झोपड्या तोडण्याचा महापालिकेचा तुघलकी निर्णय असून महापालिकेच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी 14 फुटांपेक्षा उंच झोपडीबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी अशी असे सांगत लाखो झोपडपट्टीवासियांना बेघर करण्याच महापालिकेच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.






