Wednesday, September 23, 2026

Dhaktya Sunbai Serial : ‘धाकट्या सुनबाई’मधून चिन्मयी मोरेची छोट्या पडद्यावर नवी सुरुवात; राधिकेच्या भूमिकेबद्दल सांगितल्या खास गोष्टी

Dhaktya Sunbai Serial : ‘धाकट्या सुनबाई’मधून चिन्मयी मोरेची छोट्या पडद्यावर नवी सुरुवात; राधिकेच्या भूमिकेबद्दल सांगितल्या खास गोष्टी

मुंबई : झी मराठीवरील आगामी ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी मोरे छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत पदार्पण करत आहे. या मालिकेत ती ‘राधिका’ ही सोज्वळ, प्रेमळ आणि आपल्या माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या तरुणीची भूमिका साकारत आहे. नात्यांमधील जिव्हाळा, माणुसकी आणि भावनिक गुंफण असलेली ही कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Dhaktya Sunbai Serial)

बालकलाकार ते प्रमुख भूमिका; चिन्मयीचा खास प्रवास

मूळची नागपूरची असलेल्या चिन्मयीची अभिनयाशी लहानपणापासूनच नाळ जोडली गेली. तिची आई नाट्य क्षेत्रात असल्याने ती अवघ्या १० दिवसांची असताना पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली. त्यानंतर बालकलाकार म्हणून काम करताना तिने व्यावसायिक नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि जाहिराती अशा विविध माध्यमांत काम केले. पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चिन्मयीसाठी आता डेली सोपमधील ही प्रमुख भूमिका अभिनयाच्या प्रवासातील नवा टप्पा ठरली आहे. (Dhaktya Sunbai Serial)

‘राधिका’ साकारताना व्यक्तिरेखेशी जोडण्याचा प्रयत्न

राधिका प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारी आणि कठीण परिस्थितीतही आनंद शोधणारी मुलगी आहे. तिच्या भूमिकेसाठी ऑडिशनद्वारे निवड झाल्याचे चिन्मयीने सांगितले. अभिनेता अमित फाटक यांनी प्रोडक्शनमध्ये तिचे नाव सुचवले होते. प्रत्येक प्रसंग साकारण्यापूर्वी राधिका काय विचार करेल, काय अनुभवेल आणि तिची प्रतिक्रिया कशी असेल, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने सांगितले. (Dhaktya Sunbai Serial)

सहकलाकार आणि मंदारसोबत छान गट्टी

मालिकेतील सहकलाकार आणि दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल चिन्मयीने कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः डेली सोपचा पहिलाच अनुभव असल्याने टीमचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे तिने नमूद केले.

मंदारसोबतच्या ट्युनिंगबद्दल बोलताना चिन्मयी म्हणाली की, दोघांची चांगली मैत्री झाली असून त्यांचे विचार आणि ‘व्हाइब्स’ही छान जुळत आहेत. तो सहकलाकार म्हणून तिला सांभाळून घेतो आणि सतत पाठिंबा देतो. ऑफस्क्रीन मैत्रीमुळे ऑनस्क्रीन केमिस्ट्री अधिक सहज होण्यास मदत होते, असेही तिने सांगितले. (Dhaktya Sunbai Serial)

‘धाकट्या सुनबाई’मधून चिन्मयी मोरे प्रेक्षकांसमोर राधिकेच्या रूपात येणार असून, तिच्या या नव्या इनिंगकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >