Saturday, September 26, 2026

रोजगार महाकुंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला उद्घाटन, राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन; ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा

रोजगार महाकुंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला उद्घाटन, राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन; ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ एसएनडीटी महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करून नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आणि विविध क्षेत्रांतील कंपन्या व नियोक्ते यांना एका व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या मुंबईतील उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, आकाश फुंडकर, महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोजगार महाकुंभामध्ये फक्त रोजगार मेळावे घेण्याऐवजी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव यांची उपलब्ध रोजगाराच्या संधींशी सांगड घालण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी उमेदवार आणि कंपन्यांकडील रिक्त पदांचे ‘कॅन्डिडेट-व्हॅकन्सी मॅचिंग’ करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या पात्रतेनुसार उपलब्ध पदांची माहिती मिळवून त्याला संबंधित नियोक्त्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रक्रियेत केला जाणार आहे.(Maharashtra Job Fair)

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी तयार करण्यावरही भर देण्यात आला आहे. मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स यासाठी प्री-प्लेसमेंट प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील बॅच ७ ते १० सप्टेंबरदरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यातील बॅच २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली. त्यामुळे रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कंपन्यांच्या भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील नियोक्ते आणि रोजगाराच्या शोधात असलेले युवक-युवती यांच्यात थेट संपर्क निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपलब्ध रिक्त पदांची माहिती, उमेदवारांची पात्रता आणि कंपन्यांच्या अपेक्षा यांची सांगड घालून भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.(Maharashtra Job Fair)

दरम्यान, रोजगार महाकुंभाचा विशेष भाग म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विविध कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात येणार असून, संबंधित कंपन्यांमधील उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत महिलांना माहिती मिळणार आहे. उपलब्ध पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व कौशल्ये, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी तसेच भरती प्रक्रियेची माहिती महिलांना या मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि मुलाखतीला सामोरे जाण्याची संधीही उमेदवारांना उपलब्ध होणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराच्या संधींशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी चालना देणे, हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.(Maharashtra Job Fair)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >