Nashik Crime : शेतातील ट्रान्सफॉर्मरमधून वायरद्वारे वीज घेतल्याप्रकरणी कारवाईची भीती दाखवून १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात महावितरणच्या वायरमनसह एका खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १० हजार रुपये यापूर्वी स्वीकारल्यानंतर उर्वरित ५ हजार रुपये स्वीकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान, सापळ्याची चाहूल लागताच संबंधित वायरमन फरार झाला.
या प्रकरणी जितेंद्र ठाकूर, वायरमन, महावितरण विभाग, वडाळीभोई, चांदवड, तसेच कृष्णा काशिनाथ ढोमसे (वय ३०, औषध विक्रेता, रा. गोरठाण, शिरवाडे वणी, निफाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईची भीती दाखवून १५ हजारांची मागणी
तक्रारदाराची चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे शेतजमीन आहे. या शेतातील ट्रान्सफॉर्मरमधून वायरद्वारे वीज घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, ऑगस्ट २०२६ मध्ये वायरमन जितेंद्र ठाकूर याने कारवाईची भीती दाखवून प्रकरण टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. भीतीपोटी तक्रारदाराने त्यावेळी ठाकूरला १० हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित पाच हजार रुपयांसाठी ठाकूरने अलीकडेच तक्रारदाराच्या भावाशी संपर्क साधला.
बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म निर्माता यशपाल शर्मा यांचा सख्खा भाऊ राजेश कुमार याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक ...
पैसे न दिल्यास कामात अडथळा आणण्याची धमकी
उर्वरित पाच हजार रुपये न दिल्यास शेतात मीटर बसविणे तसेच कोटेशनशी संबंधित कामात अडथळा आणण्याचे सांगण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. वायरमन ठाकूरने उर्वरित पाच हजार रुपये खासगी व्यक्ती कृष्णा ढोमसे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ढोमसेला रंगेहात पकडले.
सापळ्याची चाहूल लागताच वायरमन फरार
एसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केल्याची चाहूल लागताच वायरमन जितेंद्र ठाकूर घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ आणि ७-अ अन्वये जितेंद्र ठाकूर आणि कृष्णा ढोमसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके आणि पोलीस हवालदार योगेश साळवे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करीत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.