Sunday, September 27, 2026

Dengue Cases Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ, महापालिकेच्यावतीने धुम्रफवारणीकरता टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड

Dengue Cases Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ, महापालिकेच्यावतीने धुम्रफवारणीकरता टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड

तब्बल दहा महिन्यांपासून निविदेत अडकली होती औषध खरेदी

मुंबई (सचिन धानजी)

मुंबईत सध्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढत असून विशेषत: डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची वाढती संख्या आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पाडत आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखून त्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी अधिकाधिक धुम्र फवारणी आणि औषध फवारणी करणे आवश्यक असते. परंतु फवारणी करण्यात येणारीच औषधे प्रभावशील नसल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच आता महापालिकेच्यावतीने टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड या औषधे खरेदी केली जात आहेत. मात्र, तब्बल दहा महिने ही औषधे निविदेच अडकून पडलेली आहेत.

मुंबईतील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या किटक नाशक विभागामार्फत नियमित धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या किटकनाशक विभागाच्यावतीने लॅम्बडा सायहॅलोथ्रिन, टेमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड या औषधांची खरेदीची प्रक्रिया नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला यासाठीच्या औषधांची खरेदी उत्पादक म्हणून नोंदणीकृत असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून सुरु होती. यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या परिपत्रकाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने एमएसएमई अंतर्गत निविदा प्रक्रियेत भाग घेणा-या कंपन्यांना अनामत रक्कम व निविदा शुल्कात सुट देण्यास भाग पाडत उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये याबाबतची निविदा रद्द करण्यात आली. त्यानुसार सुधारीत निविदा मागवण्यात आली. मार्च २०२६ पर्यंत ही निविदा प्रक्रिया सुरु असतानाच या औषधांची खरेदी जेम पोर्टलवरून खरेदी करण्याची मागणी झाली. त्यानुसार पुन्हा यासाठीची दुसरी निविदा रद्द करून जेम पोर्टलवरून तिसऱ्यांदा निविदा मागण्यात आली.

त्यानुसार आता ऍल्युमिनियम फॉस्फाईड ५,००० लिटर, टेमिफॉस २८,००० लिटर आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५,००० लिटरची खरेदी केली जात आहे. यासाठी रमेश ऍग्रोकेम कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी ३.१९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी काह दिवसांपूर्वी मुंबईतील वाढत्या साथीच्या आजारांबाबत आणि विशेषत: डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांबाबत चिंता व्यक्त करत किटक नाशक विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच डासांच्या वाढत्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धूर फवारणीचे औषध प्रभावशील नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे या नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांची मात्र डासांवर कशी लागू होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या मासिक तुलना अहवालानुसार, यंदा जानेवारी ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या ६,२७७ रुग्णांच्या तुलनेत यंदा ८,७२३ रुग्ण आढळले आहेत. तर जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ४३०४ मलेरियाचे रुग्ण होते आणि आणि जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीमध्ये ५९८४ मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मलेरियासह डेंग्यूचेही रुग्ण वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >