Sunday, September 27, 2026

कुलदीप यादवच्या फिरकीमुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला ब्रेक, भारतापुढे 296 धावांचं आव्हान

कुलदीप यादवच्या फिरकीमुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला ब्रेक, भारतापुढे 296 धावांचं आव्हान
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी स्वीकारताना शुभमन गिलने सांगितलं की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी बरीच चांगली दिसतेय. खेळपट्टी बऱ्यापैकी चांगली दिसतेय, खूप गरम आहे, त्यामुळे मला वाटतं की लाईट्सच्या प्रकाशात ती आणखी चांगली कामगिरी करेल, म्हणून आम्ही पाठलाग करण्याचा प्रयत्न करू.' दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला चांगलंच झुंजावं लागलं. वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. दरम्यान, त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव घसरला आणि भारताने कमबॅक केलं. वेस्ट इंडिजने 50 षटकात 7 गडी 295 धावा करून विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं आहे.

वेस्ट इंडिजचा डाव

वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि जस्टीन ग्रीव्ह्स ही जोडी फलंदाजीसाठी ओपनिंगला आली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची विक्रमी भागीदारी केली. जॉन कॅम्पबेलने 60 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्यानंतर ग्रीव्ह्स मैदानात तग धरून होता. त्याला केसी कार्टी आणि शाई होपची थोडी फार साथ मिळाली. पण ते फार काळ तग धरू शकले नाहीत. केसी कार्टी 13, शाई होप 15 धावा करून बाद झाले. तर जस्टीन ग्रीव्ह्सने 108 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. त्यानंतर त्याची विकेट पडली. त्याच्यापाठोपाठ जेवेल अँड्र्यू याची विकेट पडली. त्याला खातही खोलता आलं नाही. तर आमिर जांगुने अर्धशतक ठोकून विंडीज संघाला चांगल्या स्थितीत आणलं.
भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी गोलंदाजी केली. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे चार फलंदाज अडकडे. कुलदीप यादवने 10 षटकात 40 धावा देत 4 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 10 षटकात 2 गडी बाद करत 60 धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डीने सुरूवातीला सुमार गोलंदाजी केली. पण शेवटच्या षटकात त्याला काही अंशी दिलासा मिळाला. नितीश कुमार रेड्डीने 5 षटकात 45 धावा देत 1 विकेट काढली. दुसरीकडे, गुरनूर ब्रार सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने सहाच्या इकोनॉमीने 60 धावा दिल्या. पण एकही विकेट घेता आली नाही. रवींद्र जडेजाने 10 षटकात 54 धावा दिल्या, नमन धीरने 5 षटकात 33 धावा दिल्या. या तिघांना एकही विकेट मिळाली नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >