
Tata Nexon : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सच्या लोकप्रिय SUV पैकी एक असलेल्या नेक्सॉनची मोठी चर्चा आहे. कंपनी आता या कारच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर काम करत असून, हे नवीन मॉडेल पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. नव्या नेक्सॉनमध्ये एक्स्टिरियरपासून इंटिरियरपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. नुकताच या कारचा एक स्पाय व्हिडिओ समोर आला असून, त्यातून नवीन मॉडेलच्या डिझाइनची आणि फीचर्सची झलक पाहायला मिळाली आहे.
टाटा नेक्सॉन ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कधी नेक्सॉन तर कधी पंच ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरते. आता कंपनी नेक्सॉनला नव्या रूपात सादर करण्याच्या तयारीत आहे. या आगामी मॉडेलचे कोडनेम 'गरुड' असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही या कारची टेस्टिंग करतानाची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे, कंपनी या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवरही काम करत आहे. नेक्सॉन EV च्या नव्या मॉडेलचे बाह्य डिझाइन पेट्रोल-डिझेल व्हर्जनशी मिळतेजुळते असण्याची शक्यता आहे.
नव्या टाटा नेक्सॉनचा लूक कसा असेल ?
नवीन जनरेशन नेक्सॉनच्या बाह्य डिझाइनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सध्याच्या मॉडेलमधील काही डिझाइन घटक कायम ठेवले जाण्याची शक्यता असली, तरी नवीन कार अधिक बॉक्सी आणि आकर्षक दिसू शकते. नव्या मॉडेलमध्ये उंच फ्रंट प्रोफाइल आणि सपाट रूफलाइन दिली जाऊ शकते. रूफलाइनमध्ये होणाऱ्या बदलामुळे मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना अधिक हेडरूम मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामान ठेवण्यासाठीही अधिक जागा उपलब्ध होऊ शकते.
टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या कारवर कॅमोफ्लॉज असल्यामुळे संपूर्ण डिझाइन स्पष्ट झालेले नाही. मात्र, फ्रंट ग्रिल आणि लाइटिंग सेटअपमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्क्युलर व्हील आर्च, टर्न इंडिकेटरसह रेक्टँग्युलर ORVM आणि पारंपरिक पुल-टाइप डोअर हँडल्स पाहायला मिळू शकतात.
17 आणि 18 इंच अलॉय व्हील्सचा पर्याय ?
नवीन नेक्सॉनच्या अलॉय व्हील्सच्या डिझाइनमध्येही बदल होऊ शकतो. समोर आलेल्या स्पाय शॉट्समध्ये ही SUV 17 इंचांच्या अलॉय व्हील्ससह दिसली आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये कंपनी 18 इंचांच्या अलॉय व्हील्सचा पर्याय देऊ शकते. यापूर्वीही या कारला वेगळ्या डिझाइनच्या 18 इंच अलॉय व्हील्ससह टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आले होते. मागील बाजूस नवीन टेल लॅम्प आणि अपडेटेड बंपर मिळण्याचीही शक्यता आहे.
इंटिरियरमध्ये मिळणार मोठे बदल
नवीन नेक्सॉनच्या केबिनमध्येही अनेक अपडेट्स अपेक्षित आहेत. टेस्टिंगदरम्यान कारचा बहुतांश भाग झाकलेला असल्यामुळे इंटिरियरची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्पाय शॉट्सनुसार कारमध्ये टू-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि इल्यूमिनेटेड टाटा लोगो कायम राहण्याची शक्यता आहे. स्टीअरिंगवरील कंट्रोल्समध्ये मात्र बदल होऊ शकतात. याशिवाय नवीन मॉडेलमध्ये स्लिम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम दिली जाऊ शकते. यामुळे कारचा केबिन अधिक आधुनिक आणि प्रीमियम होण्याची अपेक्षा आहे.
Technology News: WhatsApp आपल्या Android वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमध्ये ॲपमध्ये स्वतंत्र 'Contacts' टॅब दिला जाणार आहे. यामुळे ...
पॅनोरॅमिक सनरूफपासून व्हेंटिलेटेड सीट्सपर्यंत फीचर्स
नवीन टाटा नेक्सॉनमध्ये आराम आणि सुविधांच्या दृष्टीने अनेक प्रीमियम फीचर्स मिळू शकतात. यामध्ये पुढील सुविधांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
- मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- लेदर अपहोल्स्ट्री
- पॅनोरॅमिक सनरूफ
- व्हेंटिलेटेड सीट्स
- अॅम्बियंट लायटिंग
- एअर प्युरिफायर
- इनबिल्ट DVR
या फीचर्समुळे नवीन नेक्सॉनची केबिन अधिक आरामदायी आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज होऊ शकते.
सुरक्षेसाठी ADAS आणि 360 डिग्री कॅमेरा
सुरक्षेच्या बाबतीतही नवीन नेक्सॉनमध्ये महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. आगामी मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS सारखी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाची सुविधा मिळू शकते. याशिवाय सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), चारही चाकांना डिस्क ब्रेक्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखी फीचर्स दिली जाण्याची शक्यता आहे.
इंजिनमध्ये काय बदल होणार ?
नवीन जनरेशन टाटा नेक्सॉनमध्ये सध्याचे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. ही SUV पेट्रोल, डिझेल आणि CNG अशा पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकते. मात्र, डिझेल इंजिनमध्ये कंपनीकडून काही तांत्रिक अपडेट्स केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मॉडेलच्या इंजिनची कार्यक्षमता आणि ड्रायव्हिंग अनुभवात सुधारणा होऊ शकते.
कधी लॉन्च होणार नवीन टाटा नेक्सॉन ?
सध्या टाटा मोटर्सकडून नवीन जनरेशन नेक्सॉनच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ही SUV 2027 मध्ये भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. अधिकृत लॉन्चिंग, किंमत आणि व्हेरिएंट्सबाबत कंपनीकडून माहिती समोर आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. एकूणच, नवीन डिझाइन, आधुनिक इंटिरियर, प्रगत सुरक्षा फीचर्स आणि विविध इंजिन पर्यायांमुळे आगामी टाटा नेक्सॉनकडून ग्राहकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.






