Monday, September 28, 2026

१२ फूट लांबीच्या अजगराने गावात उडवली खळबळ ! २० किलोच्या नीलगायच्या पाडसाला गिळले अन्...

१२ फूट लांबीच्या अजगराने गावात उडवली खळबळ ! २० किलोच्या नीलगायच्या पाडसाला गिळले अन्...

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तब्बल १२ फूट लांबीच्या अजगरामुळे एका गावात मोठी खळबळ उडाली. शेतातून बाहेर पडलेला हा विशाल अजगर थेट लोकवस्तीच्या दिशेने आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आपल्या मुलांसह पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवत घरातच राहणे पसंत केले.ही घटना गंगापार परिसरातील थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमलहिया गावातील आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अजगराची लांबी सुमारे १२ फूट होती आणि त्याचे वजनही मोठे होते. अजगर लोकवस्तीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच शेतात काम करणारे नागरिक घाबरून दूर पळाले. काही वेळातच संपूर्ण गावात अजगर आल्याची माहिती पसरली.

२० किलोच्या नीलगायच्या पाडसाला जखडले

गावात फिरत असताना अजगराची नजर सुमारे २० किलो वजनाच्या नीलगायच्या पाडसावर पडली. अजगराने पाडसाला आपल्या विळख्यात घेतले. हे दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या अंतरावर उभे राहिले; मात्र अजगराच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीही केले नाही. काही वेळ पाडसाला विळखा घातल्यानंतर अजगराने त्याला हळूहळू गिळण्यास सुरुवात केली. सुमारे ६ मिनिटांत अजगराने नीलगायच्या पाडसाला गिळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या संपूर्ण घटनेचा काही नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओही रेकॉर्ड केला.

४२ मिनिटांनी पाडस पुन्हा बाहेर काढले

या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. नीलगायचे पाडस गिळल्यानंतर सुमारे ४२ मिनिटांनी अजगराने ते पुन्हा बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखी कुतूहल आणि भीती निर्माण झाली. अजगरामुळे जवळपास सहा तास गावात भीतीचे वातावरण होते. अजगर पुन्हा एखाद्या घराकडे किंवा पाळीव प्राण्यांकडे जाऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांना होती.

अन् वनविभाग पथक घटनास्थळी पोहचले

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस आणि वन विभागाला कळवले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक अजगराला पकडून सुरक्षितपणे बोऱ्यात ठेवले आणि त्याला तेथून हलवले. अजगर पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >