मुंबई : महाराष्ट्रात यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 अंतर्गत दुष्काळाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या असून पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
28 सप्टेंबर रोजी कोकणातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, आज कोणत्याही जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. 29 सप्टेंबरला रायगड आणि रत्नागिरीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय ...
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली भागातही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्याच्या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र, काही भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नाशिकच्या घाटमाथ्याला 29 सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस होऊ शकतो. बीड आणि धाराशिवला यलो अलर्ट असून काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भातही मोठ्या पावसाची शक्यता कमी असून अनेक भागांत पावसाची उघडीप कायम राहू शकते. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असला तरी अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.





